वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) - जिल्हा कोरोनामुक्त असतानाही जिल्ह्याचा समावेश ऑरेंज झोनमध्ये करण्यात आलाय. मात्र, सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनामुक्त असल्यामुळे ग्रीन झोन जिल्ह्यांच्या यादीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश करण्यासाठी प्रधान सचिवांना सुचना करणार असल्याची माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. ते वेंगुर्ल्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.
कोरोनाचा संसर्ग झालेला एक तरुण जिल्ह्यातील कणकवलीत आढळला होता. त्याने 19 मार्चला मंगलोर एक्सप्रेसने मुंबई ते कणकवली असा प्रवास केला होता. या रेल्वे गाडीत 'एस 3' डब्यात कोरोनाबाधित रुग्ण होता. या तरुणाला सहप्रवाशाकडून कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. या रुग्णाचे रिपोर्ट हे कोरोना पॉझिटिव्ह आले होते.
कोरोनाबाधित रुग्णाला ओरोस येथील रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यानंतर 14 दिवसांनी त्याचे स्वॅब टेस्ट घेतली असता त्याचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आले. या चाचणीचा अहवाल 3 एप्रिलला मिळाला. मात्र, त्यानंतरही पुढचे काही दिवस त्याला निगराणी खाली ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला असून पुढील 14 दिवस त्याला होम क्वारंटाईन करण्यात आले. यामुळे जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही.