सिंधुदुर्ग - गणेश चतुर्थीला कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांनी आपल्या आरोग्याच्या काळजी सोबतच नियमांचे पालन करायचे आहे. या चाकरमान्यांचा प्रवेश सुखकर व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. सरपंच संघटनेच्या मागण्यांचाही विचार केला जाईल. असे मत पालकमंत्री उदय सामंत यांनी कणकवलीत बोलताना व्यक्त केले.
शासनाच्या नियमाप्रमाणे चाकरमान्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जाईल. त्यांच्या कॉरंटाइनचा कालावधी कमी करता येईल का याबाबत राज्य शासन विचार करत आहे. यासोबतच आपण मंत्रालयात नुकतीच बैठक घेतली आणि यावेळी काही मुद्यांवर चर्चा झाली. ही चर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातलेली आहे. असेही मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात येणार्या चाकरमान्यांना 7 दिवस क्वारेंटाईन करण्याचा निर्णय झाला, तर सर्व सरपंच आपल्या संनियंत्रण समितीचा राजीनामा देतील अशी भूमिका सरपंच संघटनेने घेतली आहे. याबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले, कॉरेंटाइन बाबतीतले केंद्र सरकारच्या आणि आरोग्य विभागाच्या काही मार्गदर्शक सूचना आहेत, त्या पाळाव्याच लागतील. मात्र, चाकरमान्यांच्या प्रश्नांबाबत निर्णय घेताना सरपंच संघटनांचे म्हणणेही समजून घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - गणेशोत्सवादरम्यान कोकणात गाड्या सोडण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेणार