सिंधुदुर्ग - शिवसेना नेते राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रत्नागिरीत नुकतीच गुप्त भेट घेतली असल्याचा दावा माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
राजकीय वर्तुळात एकच चर्चा
तौक्ते चक्रीवादळाची गंभीर परिस्थिती सिंधुदुर्गात असतानाही उदय सामंत फडणवीसांना भेटण्यासाठी खास रत्नागिरीत आले होते. या दोघांमध्ये बंद दरवाजा आड चर्चा झाल्याचा गौप्यस्फोट निलेश राणे यांनी केला आहे. निलेश राणे यांच्या या खळबळजनक दाव्यामुळे एकच चर्चा सुरू आहे. तौक्ते वादळात नुकसान झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा सोडून उदय सामंत यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची भेट घेण्यासाठी तातडीने भेट घेण्याचे नेमक कारण काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उदय सामंत स्वतःची कामे करणारे सोशलवर्कर -
माजी खासदार निलेश राणे यांनी बोलताना त्यानी उदय सामंत यांनी रत्नागिरीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या घेतलेल्या भेटीचा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणालेत, तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पूर्वतयारी म्हणून कोणतीही खबरदारी घेतलेली नाही. मुळात शासन- प्रशासनावर मंत्र्यांचा कोणताही अंकुश नाही. सिंधुदुर्गात वादळाची परिस्थिती असतानाही येथील पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरीमध्ये येतात. त्याठिकाणी बंद खोलीत देवेंद्रजी यांच्याशी चर्चा करतात. सिंधुदुर्गातील जनता वादळाने होरपळली असताना आपली राजकीय समीकरणे कशी जुळतील, हे पाहण्यासाठी आमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री येथील जनतेला वाऱ्यावर सोडून रत्नागिरीकडे धाव घेतो. मुळात उदय सामंत हा कधीही नेता होऊ शकत नाही. तो फक्त स्वतःची कामे करणारा सोशल वर्कर असल्याची टीका त्यांनी केली आहे.
हेही वाचा - 'कोकणवासीयांना लवकर मदत न दिल्यास मंत्रालयाबाहेर उपोषण करेन'