सिंधुदुर्ग - मालवण तारकर्ली समुद्रकिनारी 20 पर्यटकांना घेऊन गेलेली बोट बुडाली ( boat sank ) आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून चार पर्यटकांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर मालवण शासकीय रुग्णालयात या पर्यटकांवर उपचार सुरू आहेत. 20 पर्यटकांपैकी 18 पर्यटकांना वाचविण्यात यश आले आहे. 14 पर्यटक सुखरूप असून त्यांना स्थानिकांनी तत्काळ पाण्याबाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे. हे पर्यटक स्कुबा डायविंगसाठी गेले असताना हा अपघात घडला आहे.
सध्या कोकण किनारपट्टीवर वादळ सदृश परिस्थिती आहे. जोरदार वारे वाहत आहेत यावी असलेल्या खराब हवामानामुळे बोट बुडाली असल्याचे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच मालवण पोलीस घटनास्थळी दाखल झालेत, ते या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. स्थानिकांच्या मदतीने या ठिकाणी तत्काळ मदत कार्य राबविण्यात आल्याने बाकी पर्यटकांना वाचविण्यात यश आले आहे.
पर्यटकांना स्कुबा डायविंगसाठी घेऊन जाणाऱ्या या बोटीवर एकूण 20 पर्यटक होते. या पर्यटकांमध्ये लहान मुलांचाही समावेश होता. सध्या किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहत असल्याने स्कूबा डायव्हिंगवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही ज्या व्यावसायिकांनी या पर्यटकांना स्कुबा डायविंग घडविण्यासाठी समुद्रात नेले त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे मालवण पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - बिबट्याचे कातडे घेऊन जाणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात