सिंधुदुर्ग - आईसोबत गेलेल्या दोन मुलांचा चिरेखाणीत बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना दोडामार्ग तालुक्यातील वझरे येथे रविवारी घडली. धोंडीराम भगवान जंगले (वय-8) आणि नागेश विठ्ठल जंगले (वय-10)अशी मृत मुलांची नावे आहेत.
दोडामार्ग तालुक्यातील वझरे येथे असलेल्या उघड्या चिरेखाणीच्या परिसरात या मुलांची आई कपडे धूत होते. यावेळी तिची नजर चुकवत हे दोघे या परिसरात गेले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे बुडाले. हा प्रकार लक्षात येईपर्यंत वेळ झाला होता. दोघा चिमुकल्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. याबाबत अधिक तपास दोडामार्ग पोलीस करीत आहेत. याप्रकरणी खाणमालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, महसूल विभागाच्या नाकर्तेपणाच्या धोरणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी केला आहे. या चिरेखाणी काम झाल्यावर बुजवल्या पाहिजेत, असा नियम असताना महसूल विभागाच्या अधिकारी या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे चिरेखाण मालक या खाणी बुजवत नाहीत. परिणामी असे प्रकार घडत आहेत, असे बाबुराव धुरी म्हणाले.