सिंधुदुर्ग - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावे रायगड जिल्ह्यातील जमिनीचा व्यवहार हा कायदेशीर झालेला आहे. भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांची बकवासगिरी चालू आहे. अन्वय नाईक मृत्यूच्या तपासाप्रकरणी कुठेतरी जनतेचे लक्ष विचलित व्हावे यासाठी किरीट सोमय्या हे सर्व प्रताप करत आहेत. असा आरोप शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी सोमय्या यांच्यावर आरोपही केले आहेत.
तिथे 19 बंगले नाहीत हे आधीच स्पष्ट झाले आहे -
किरीट सोमय्या यांच्या बकवास गिरीत मला जायचे नाही. मात्र, रवींद्र वायकर यांनी याबाबत यापूर्वीच स्पष्ट खुलासा केलेला आहे. किरीट सोमय्या म्हणतात त्याप्रमाणे या जमिनीमध्ये किती बंगलो आहेत, ते कोणीही जाऊन पहावे म्हणजे सत्य समोर येईल. रायगड जिल्ह्यातल्या कोलई येथील ग्रामपंचायतीने असेसमेंट केलेली दोन-तीन घरे वगळता या ठिकाणी काहीही नाही असेही शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत म्हणाले.
किरीट सोमय्या यांच्या मुलावर खंडणीचे आरोप -
किरीट सोमय्या यांना काही काम राहिलेले नाही. त्यांच्या मुलावर खंडणीचे आरोप झालेले आहेत. असे सांगतानाच अन्वय नाईक यांच्या बाबत सरकारने कारवाई करण्याच्या दृष्टीने योग्य ती पावले उचललेली आहेत. दादरा नगर हवेलीच्या खासदारांनी मुंबईत केलेल्या आत्महत्येनंतर त्यांनी जे काही लिहून ठेवले आहे, हे पोलिसांच्या समोर आले आहे. त्यामध्ये भाजप पक्ष एखाद्याच्या मागे लागल्यानंतर किती हात धुऊन मागे लागतो हे स्पष्ट झाले आहे, असे यावेळी विनायक राऊत म्हणाले.
काय आहे हे प्रकरण ? -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीच्या नावे रवींद्र वायकर यांनी ही जागा भेट दिली आहे. या जमिनीवर रश्मी ठाकरे व मनीषा वायकर यांची नावे आहेत. अनव्य नाईक यांच्याकडून ही जागा विकत घेतली आहे. ही जमीन खरेदी करताना आर्थिक घोटाळा आणि कागदपत्रांचा फेरफार झाला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यानंतर सोमय्या यांनी हे प्रकरण उचलून धरले आहे.
या जागेत १९ घरे असल्याचेही सोमय्या यांचे म्हणणे -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीच्या व मनीषा वायकर यांच्या नावे कोर्लई येथे जागा आहे. या जागेत १९ घरे असल्याचेही सोमय्या यांचे म्हणणे आहे. या घराची घरपट्टी कोर्लई ग्रामपंचायतीकडे भरली जात आहे. मात्र, घराबाबतची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लपवली असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांवर कारवाई व्हावी यासाठी किरीट सोमय्या यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषणही केले होते.