सिंधुदुर्ग- कणकवली शहरात रात्री दोन ते साडेतीनच्या सुमारास दोन अपार्टमेंटमधील ४ ब्लॉक चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली आहे. चारही खोल्यांमध्ये त्यांना किमती ऐवज मिळाला नाही. त्यामुळे या अपार्टमेंट खाली असलेली दुचाकी चोरण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र, तेथेही त्यांना यश आले नाही. त्यामुळे दुचाकी मधील पेट्रोल लंपास करून चोरटे गायब झाले. मात्र, एकाच रात्री चार ठिकाणी घरफोड्या झाल्याने शहरात भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान, घरफोडी करताना चोरट्यांनी अपार्टमेंटमधील इतर खोल्यांना बाहेरून कडी लावली होती. त्यामुळे फ्लॅट मधील रहिवाशी काहीकाळ अडकून पडले. सकाळी पेपर विक्रेते आणि दूधवाले आल्यानंतर या कड्या काढण्यात आल्या. शहरातील मसुरकर किनई येथील श्रीधर पार्क मधील पहिल्या मजल्यावरील रमेश परब आणि विष्णू परब यांचे ब्लॉक फोडण्यात आले. यात चोरट्यांनी कपाटे आणि शोकेस विस्कटून टाकली. मात्र, चोरट्यांच्या हाती काहीही किमती ऐवज मिळाला नाही. त्यामुळे हताश झालेल्या चोरांनी याच अपार्टमेंट खालील दोन गाड्या चोरण्यासाठी वायरिंग फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाड्या चोरण्यात ते अपयशी ठरले.
चोरी झालेली ठिकाणे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सजकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तसेच पोलीस स्थानकाच्या जवळील परिसरात चोरीचा प्रयत्न झाल्याने पोलिसांना चोरांनी आव्हान दिल्याची चर्चा आहे. या चोरीचा तपास कणकवली पोलीस करीत आहेत.