सिंधुदुर्ग - कणकवली राज्य मार्गावरील नाटळ गावातील मल्हारी पूल पुराच्या तडाख्याने कोसळला आहे. हा पूल अगोदरच मोडकळीस आलेला होता. या घटनेमुळे नाटळ, नरडवे, दारीस्ते, दिगवळे, तसेच, कनेडी परिसरातून घोटगे, जांभवडे, कुपवडे, सोनवडे गावाकडे जाणारी वाहतूक खंडीत झाली आहे. तर, जाणवली नदीला पूर आल्याने, हे पाणी कणकवलीमधील कातकरी वस्तीत घुसले आहे. या घटनेत सुमारे आठ कुटुंबे उघड्यावर आली आहेत.
वाहतूक बंद होण्याचा प्रकार पहिल्यांदा
या मार्गांवरील पुलांची उंची वाढवल्यावर गेल्या सोळा वर्षात पुराच्या पाण्यामुळे वाहतूक बंद होण्याचा प्रकार पहिल्यांदा घडला. सकाळी 7 वाजल्यापासून 4 तास रेकॉर्ड ब्रेक मुसळधार पाऊस झाला. यामुळे कधी नाही एवढा नद्यांना पूर आला. कनेडी कणकवली मार्गावरील सांगवे येथील श्री देव रामेश्वर मंदिराला गड नदीच्या पुराच्या पाण्याने वेढा घातला. मल्हारी पुलाच्या नाटळ बाजूच्या दिशेकडील तिसऱ्या पिलर खालील बाजूने ढासळत चालल्याचे महिन्यापूर्वी निदर्शनास आले. त्यानंतर, तात्पुरती डागडुजी करून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली होती. आज आलेल्या पुराच्या पाण्यामुळे त्या पिलरवरील भाग कोसळला आहे.
झोपड्यात घुसले पुराचे पाणी
कणकवली निम्मेवाडी गावळदेव येथे राहत असणाऱ्या कातकरी कुटुंबियांच्या झोपडीत जाणवली नदीचे पाणी घुसले. जाणवली नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्याने, हे पाणी अचानक आले. त्यामुळे सुमारे आठ कुटुंबे उघड्यावर आली आहेत. या कुटूंबाचे धान्य, कपडे, भांडी असा संपूर्ण संसार वाहून गेला आहे. नदीने रौद्र रूप धारण केले आहे. वाड्यावर गरोदर महिला आणि छोटी बालके होती. पुरुष मंडळी मजुरीसाठी बाहेर गेले होते. अचानक, पाणी वाढल्याने त्यांनी स्वतःचा जीव वाचवला. मात्र, पुर्ण संसार वाहून गेला आहे.
चित्रकार नामानंद मोडक धावले मदतीला
हे वृत्त कळताच अखंड लोकमंचचे अध्यक्ष चित्रकार नामानंद मोडक यांनी निम्मेवाडी येथे धाव घेतली. कुटूंबियांना आपल्या घरी आणून आश्रय देत मदत केली. कातकरी कुटूंबातील एका महिलेने आणि तीन बालकांनी पुराच्या पाण्यातुन बाहेर येत आपला जीव वाचवला. मात्र, कातकरी बंधवांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे अन्न-धान्य वाहून गेले. दरम्यान, खुऱ्याड्याखालील कोंबड्या आणि काही बकऱ्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. यावेळी शैला कदम यांनी या छोट्या मुलांना आधार देत त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली.
जिल्ह्यात ठिकठिकाणी पूरस्थिती
वागदे येथे राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्यामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाघोटन नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे खारेपाटण पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गड नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळे कणकवली येथील गोपुरी आश्रमाजवळील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेला आहे. कणकवली तालुक्यात हरकुळ बुद्रुक येथे रस्त्यावर पाणी आल्याने, रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वैभववाडी तालुक्यातील जांभवडे येथील जामदा पूल पूर्णपणे बुडाला असून, गुरववाडीकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. तसेच, नदीकाठची भात शेतीचेही मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहे.