सिंधुदुर्ग - शिकारीत चलाख, क्षणात लहान कुत्र्यालाही उचलून नेण्याची ताकद असलेली वाघाटी मांजर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी मध्ये पिंजऱ्यात जेरबंद झाली. दुर्मिळ होत चाललेला हा प्राणी बिबट्या, वाघाची लहान प्रतिकृतीच असतो. हा प्राणी पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती.
सह्याद्रीत वाघाटीचा वावर-
सह्याद्री पर्वतासह वाघाटीचा वावर भारतातील पूर्वेकडील राज्ये, ब्रम्हदेश, थायलंड, इंडोनेशिया, जावा, सुमात्रा इत्यादी देशात आहे. कर्नाटक व केरळमधील सह्याद्रीच्या रांगात याचीच उपजात आढळून येते. या मांजराला घनदाट प्रकारची जंगले पसंत असून मानवी वस्तीच्या जवळ याचा वावर असतो. मानवासोबत राहणारे कुत्रे हे या मांजराची शिकार असते. शिवाय कोंबडी देखील हे मांजर पकडून खाते. अत्यंत चपळ आणि अंधारात शिकार करण्यात तरबेज असलेला हा प्राणी आहे.
सिंधुदुर्गातील सावंतवाडीत जेरबंद-
सावंतवाडी ओटवणे येथील संजय कविटकर यांनी आपल्या पोल्ट्री फार्मच्या बाजूला उंदीर घुशी यासारखे प्राणी पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात वाघाटी मांजर अडकली. भक्ष्याच्या शोधात आलेली ही दुर्मिळ प्रजातीतील रस्टी स्पॉटेड कॅट अर्थात वाघाटी पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने तिला पाहण्यासाठी बघ्यांची एकच गर्दी जमली होती.
शिकारी स्वतःच शिकार-
वाघाटी हा प्राणी लहान कुत्रे, कोंबड्या यांची शिकार करण्यात पटाईत असतो. अगदी घरालगत पडवीत येऊन तो शिकार करतो. मात्र, हाच शिकारी स्वतः शिकार झाल्याची घटना घडली आणि ती चर्चेचा विषय ठरली. पहाटे संजय कविटकर यांचा कुत्रा जोरात भुंकू लागल्याने त्यांनी बाहेर येउन पाहिले असता उंदरांसाठी लावलेल्या पिंजर्यात वाघाटी अडकलेली होती.
म्हणून मांजराला वाघाटी म्हणतात-
बिबट्या, वाघासारखा हा प्राणी दिसत असल्याने त्याला वाघाटी असे म्हटले जाते. हुबेहूब बिबट्याची प्रतिकृती असलेला हा प्राणी असतो. आकार लहान असला तरी शिकारीत अत्यंत पटाईत आणि चपळ असलेला हा प्राणी आहे. वाघाटी ही कोकणात विशेषतः डोंगराच्या पायथ्याला राहणाऱ्या लोकांच्या उरात धडकी भरवते. कुत्रा हा तिचा शिकार असतो. कळायच्या आत ती कुत्र्यावर हल्ला करते आणि त्याचा आवाज येण्याअगोदर जंगलात धूम ठोकते. त्यामुळे रात्रीच्यावेळी डोंगर पायथ्याचे लोक आपल्या पाळीव कुत्र्याला घरातच बांधून ठेवतात.
हेही वाचा-'महाराष्ट्रात आमची भाषा मान्य नाही; तर आम्हाला अमेझॉन मान्य नाही', मनसेचा इशारा
हेही वाचा- गुजरात : मेंदू मृत झालेल्या अडीच वर्षांच्या मुलाने दिले पाच जणांना जीवदान