सिंधुदुर्ग – जिल्ह्यात आढळलेल्या आणखी तीन कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे. या सर्व व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
या तीन रुग्णांपैकी दोन रुग्ण हे यापूर्वी वाडा येथे कोरोनाबाधित आढळलेल्या महिलेच्या संपर्कातील आहेत. या दोन महिला अलगीकरणातच होत्या. 21 व 24 वर्षीय या दोन महिलांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा तातडीने शोध घेण्यात आला. यातील सहाव्या रुग्णाच्या संपर्कात एकूण 15 व्यक्ती आल्या असून त्यापैकी 12 व्यक्ती या अतिजोखमीच्या संपर्कातील असून 3 व्यक्ती या कमी जोखमीच्या संपर्कातील आहेत. तर सातव्या रुग्णाच्या संपर्कात एकूण 13 व्यक्ती आल्या आहेत. त्यापैकी 11 अतिजोखमीच्या संपर्कातील असून 2 व्यक्ती या कमी जोखमीच्या संपर्कातील आहेत. या सर्वांना अलगीकरणात ठेवण्यात आले असून तपासणीसाठी त्यांचा 'स्वॅब' घेण्यात येत आहे. तसेच आणखी एक रुग्ण हा कुडाळ तालुक्यातील आहे.
कुडाळ तालुक्यातील रुग्णाने दिनांक 25 एप्रिल 2020 ते 6 मे 2020 या दरम्यान आंबा वाहतुकीचे काम केले आहे. वाशी, मुंबई येथून आंबा वाहतूक करून आल्यानंतर दिनाक 6 मे 2020 रोजी त्यास कुडाळ, नेरूर येथील शाळेमध्ये संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. दिनांक 11 मे 2020 रोजी या व्यक्तीचा 'स्वॅब' तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णाच्या संपर्कात एकूण 10 व्यक्ती आल्या असून त्यापैकी 5 व्यक्ती या अतिजोखमीच्या संपर्कातील असून 5 व्यक्ती या कमी जोखमीच्या संपर्कातील आहेत. या सर्वांना अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या सर्वांचे 'स्वॅब' घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. तर नेरूर या त्याच्या गावी 'कंटेन्मेंट झोन' करून सर्वेक्षण करण्यात येत आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण 1 हजार 174 व्यक्ती अलगीकरणात असून 708 व्यक्ती गृह अलगीकरणात तर 466 व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 949 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 867 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 8 अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित 859 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 82 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 103 रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी 6 हजार 163 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात आढळलेल्या 8 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 6 रुग्ण विलगीकरण कक्षामध्ये दाखल असून इतर दोन रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.
परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक 14 मे रोजी 1 हजार 74 व्यक्ती दाखल झाल्या असून आज अखेर जिल्ह्यात एकूण 6 हजार 470 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी 697 पासेस तर परराज्यात जाण्यासाठी एकूण 4083 पास देण्यात आले आहेत. यामध्ये काल श्रमिक विषेश रेल्वेने कर्नाटकात रवाना झालेल्या कामगार व मजूरांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे.