सिंधुदुर्ग - जिल्ह्यात अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर योग्य ती खबरदारी घेतली गेली नाही. यामुळे कणकवली तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू वाढला आहे. म्हणून संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात आजपासून (गुरुवार) 8 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच ठिकठिकाणी पोलीस आणि दंगल नियंत्रक पथके तैनात करण्यात आली आहेत.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी 2 ते 8 जुलै या सात दिवसांच्या कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा लॉकडाऊन करण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्याची गुरुवारपासून कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. या लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद राहणार आहेत. प्रवासी वाहतूक बंद राहणार आहे. जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद राहणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन कार्यालये वगळता सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये दहा टक्केच कर्मचाऱ्यांची उपस्थिती असणार आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे जिल्ह्यात पोलीस यंत्रणेने उपाययोजना केल्या आहेत.
हेही वाचा - ठाण्यात आजपासून कडकडीत लॉकडाऊन; राज्यातील 'हे' जिल्हेही अद्याप लॉकचं
कणकवली तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे कणकवली बाजारपेठही सील करण्यात आली आहे. या आठ दिवसात जिल्ह्यातील नागरिकांना अनावश्यकरित्या घराबाहेर पडता येणार नाही. मात्र, शेतकरी लोकांना शेतीची कामे करता येणार आहेत. तसेच शेतीसाठी लागणारी खते किंवा औजारे, साहित्य आणायला जात येणार असल्याने आज जिल्ह्यात शेतीची कामे आणि शेतमाल आणि खतांची दुकाने उघडी होती. दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी केलेल्या लॉकडाऊनला जिल्हावासियांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.