सिंधुदुर्ग - खासदार विनायक राऊत यांच्या मालवण तालुक्यातील तळगाव येथील घरावर रात्री उशिरा बाटल्या आणि दगड फेक करण्यात आली आहे. यामुळे खासदार राऊत यांच्या घरी पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे.
सोड्याच्या बाटल्या व दगडफेक
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेवरून शिवसेना-भाजपाचे वाद विकोपाला गेले असताना रात्री उशिरा दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून खासदार विनायक राऊत यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे. तळगाव-मालवण येथील बंगल्यावर अज्ञात व्यक्तींनी सोड्याच्या बाटल्या तसेच दगडफेक केली. ही घटना मंगळवारी (काल) रात्री उशिरा घडली असून चार ते पाच व्यक्ती दुचाकीने आले होते, असे राऊत यांच्या निकटवर्तीयानी सांगितले आहे.
विनायक राऊत सध्या दिल्लीत
राऊत सध्या दिल्ली येथे असून त्यांनी राणेंच्या वक्तव्याबाबत जोरदार टिका करत पंतप्रधानांना पत्र लिहून राणेंचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी केली होती. राऊत यांचे निकटवर्तीय नागेंद्र परब यांनी या घटनेला दुजोरा देत पोलिसांकडून या अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जात असल्याचे सांगितले. तसेच हे चार ते पाच दुचाकीस्वार असल्याचे परब यांनी स्पष्ट केले. या घटनेची माहिती दिल्ली येथे विनायक राऊत यांना देण्यात आली आहे, असे परब म्हणाले.
हेही वाचा - आधी मुख्यमंत्र्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - नितेश राणे