सिंधुदुर्ग - चिपी विमानतळासाठी आवश्यक असलेल्या केंद्रस्तरीय परवानग्या मी मंत्री असल्यामुळे मिळू शकल्या आणि त्यासाठी केंद्राची भूमिका महत्त्वाची राहिली. मात्र आता कल्पनेतील विमान खूप उडवले, खऱ्या अर्थाने विमान उडवण्यासाठी चिपी विमानतळाच्या उर्वरित गोष्टी राज्याने पूर्ण कराव्यात असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले आहे. जागतिक दर्जाचा 'एक्सपर्ट डेव्हलपमेंट काउंसील' हा प्रकल्प उभारण्यासाठी राज्याने केंद्राला सहकार्य करावे. जेणेकरून याठिकाणी सर्व क्षेत्रातील तज्ज्ञ निर्माण होऊ शकतील असेही सुरेश प्रभू यांनी यावेळी म्हटले. ते रविवारी सिंधुदुर्गमध्ये बोलत होते.
जनतेचे स्वप्न सत्यात उतरण्याची वेळ आली आहे
खासदार प्रभू म्हणाले की, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे भूमीपूजन माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि मी केले होते. केंद्र स्तरावर त्याच्या राहिलेल्या परवानग्या मी केंद्रीय मंत्री झाल्यानंतर मिळवून दिल्या. विमानतळाचा उडान योजनेमध्ये समावेश करून घेतला, मात्र राज्याकडून आवश्यक पायाभूत सुविधा वेळेत पूर्ण होऊ न शकल्याने विमानतळाचे काम रखडले होते. 31 जानेवारीपर्यंत त्या पूर्ण करून देण्याचा शब्द राज्याने केंद्राला दिला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गमधील जनतेचे स्वप्न आता सत्यात उतरण्याची वेळ आल्याचे त्यांनी म्हटले.
राज्याने विकासाच्या बाबतीत केंद्राला सहकार्य कारावे
गुजरात, उत्तर प्रदेश येथील धर्तीवर दोडामार्ग तालुक्यात शंभर ते दीडशे एकर जागेमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ निर्माण करणारा जागतिक स्तरावरील "एक्सपर्ट डेव्हलपमेंट काउंन्सिल' हा प्रकल्प उभारण्याचा केंद्राचा मानस आहे. त्यासाठी जागाही पाहण्यात आली होती, मात्र ती उपलब्ध करून देण्यासाठी राज्याने केंद्राला सहकार्य करणे गरजेचे आहे. असे झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच कोकणाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही.
महाराष्ट्रात भाजपची सत्ता येईल
देशातील अनेक राज्याने मोदींचे नेतृत्व स्वीकारले आहे. केवळ कमी जागा मिळाल्यामुळे राज्यातील सत्ता गेली, परंतु यापुढे ज्यावेळी निवडणुका होतील, त्यावेळी पुन्हा महाराष्ट्रात भाजपची सत्ता येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.