सिंधुदुर्ग - जिल्ह्यात एलईडी मासेमारीमुळे लहान मच्छिमार अडचणीत आले आहेत. त्याशिवाय येथील समुद्री जीवांना धोका पोहचत आहे. समुद्र किनारी डॉल्फिन, कासव असे अनेक जीव मृतावस्थेत सापडत आहेत.
एलईडी मासेमारी एवढी विध्वंसकारी आहे की, या दिव्यांच्या प्रकाशाकडे समुद्रातील चहूबाजूची मासळी आकर्षित होते. या दिव्यांमधून निघणारी उष्णता एवढी भयानक असते की, त्यात छोटी मासळी भाजून मरते. तसेच, मोठ्या माशांची त्वचाही भाजून जाते. यात म्हाकूलसारख्या मासळीवर एलईडी दिव्यांच्या उष्णतेचा मोठा परिणाम होतो. मासळीसह समुद्री कासवांच्या डोळ्यांवर तसेच सीगल पक्ष्यांवरही या दिव्यांच्या प्रकाशाचा परिणाम होत आहे. त्यामुळेच गेल्या काही महिन्यात किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात समुद्री कासवे मृतावस्थेत सापडली आहेत. एलईडी मासेमारीमुळे माशांचे प्लवंगसारखे खाद्यही नष्ट होत असल्याने जेलिफिशसारखी मासळी किनाऱ्यालगत खाद्यासाठी येते. परिणामी किनाऱ्यालगत होणाऱ्या रापणीच्या मासेमारीस मासेच मिळत नसल्याची स्थिती आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकण किनारपट्टीतील समुद्री क्षेत्रात एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे स्थानिक मासळीच्या उलाढालीवर मोठा परिणाम झाला आहे. पर्ससीनच्या सहाय्याने पकडली जाणारी मासळी परस्पर मोठमोठ्या कंपन्यांना पाठविली जाते. गेल्या चार महिन्यांचा कालावधी पाहता पर्ससीन, एलईडी आणि परराज्यातील हायस्पीडच्या ट्रॉलर्सच्या साह्याने मोठ्या प्रमाणात मासळीची लूट झाल्याने स्थानिक पारंपरिक मच्छीमारांसह बल्याव, गिलनेट आणि ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर उपासमारीचे मोठे संकट आले आहे. एलईडीच्या मासेमारीमुळे किनारपट्टीवर मासळीच येत नसल्याने गेल्या चार महिन्यांत बाजारपेठेत मासळीच आली नाही. त्यामुळे सुमारे 50 कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल पूर्णतः ठप्प झाली आहे.
सर्वप्रथम गोव्यात एलईडी मासेमारीस सुरवात झाली. तेथील मच्छीमारांनी त्याला तीव्र विरोध दर्शविला. त्यानंतर महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत 2017 मध्ये एलईडी मासेमारीस सुरवात झाली. यात जे स्थानिक मच्छीमार यांत्रिक नौकेच्या साह्याने मासेमारी करत त्यांनी आधुनिकतेचा स्वीकार करत एलईडीच्या साह्याने मासेमारीस सुरवात केली. प्रशासनाचे दुर्लक्ष आणि लोकप्रतिनिधींचा धाक न राहिल्याने हळूहळू अनेक धनदांडग्यांनी पर्ससीनच्या नौका घेत त्यावर एलईडी बसवून मासेमारीला सुरवात केली. बघता बघता कोकण किनारपट्टी भागात पर्ससीनधारकांच्या संख्येत दोन वर्षांत मोठी वाढ झाली आहे.
10 नोव्हेंबर 2017 मध्ये केंद्र शासनाने एलईडीच्या मासेमारीवर बंदी घातली. त्यानंतर राज्य शासनाने मार्च 2018 मध्ये सागरी हद्दीत या मासेमारीला बंदी घातली. शासनाने एलईडीच्या मासेमारीवर बंदी घातली खरी; मात्र त्याची कडक अंमलबजावणी दोन वर्षांत करण्यास त्यांना अपयश आले. ज्या सत्ताधाऱ्यांनी पर्ससीनच्या मासेमारीस बंदीचा निर्णय घेतला, त्याच पक्षांचे नेते पर्ससीनधारकांसोबत राहिल्याचे सातत्याने दिसून आले. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्गात पारंपरिक, पर्ससीननेटधारक मच्छीमारांबाबत वेगवेगळी भूमिका दिसून आली. पर्ससीनच्या मासेमारीला केवळ सप्टेंबर ते डिसेंबरचा कालावधी निश्चित झाला. त्यासाठी 12 नॉटीकलच्या बाहेर त्यांनी मासेमारीचे निर्देशही दिले. मात्र, मुदतीनंतरही म्हणजेच जानेवारी महिन्यापासून गेले चार महिने पर्ससीन तसेच एलईडी मासेमारी सुरूच असल्याचे दिसत आहे. जर पर्ससीनच्या मासेमारीला बंदी घातली तर मग पर्ससीनच्या नौका समुद्रात कशा, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. बंदी असल्याने पर्ससीनच्या सर्व नौका किनाऱ्यावर काढणे आवश्यक असताना मत्स्य व्यवसाय खात्याकडून याची आवश्यक ती कार्यवाहीच होत नसल्याचे दिसून येत आहे.