सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात आठवडाभरापासून संततधार सुरू आहे. शनिवारी पावसाचा जोर वाढल्याने सायंकाळी पुन्हा भुईबावडा घाटात गगनबावड्यापासून अंदाजे ४ कि. मी. अंतरावर दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक एकेरी सुरू आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी उपअभियंता घटनास्थळी दाखल झाले आहेत.
शनिवारी दिवसभरात दोन वेळा कोसळली दरड
शनिवारी सकाळपासूनच संततधार सुरू आहे. शनिवारी दिवसभरात दोन वेळा भुईबावडा घाटात दरड कोसळली. दरम्यान सायंकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी उपअभियंता आपल्या सहकाऱ्यांसमवेत भुईबावडा घाटात रवाना झाले.
घाट रस्ता भेगांमुळे खचला
भुईबावडा घाटातून वाहतूक वाढल्याने रिंगेवाडीपासून ३ ते ४ कि. मी. अंतरावर रस्त्यावर पडलेल्या भेगांमुळे रस्ता अधिकच खचत चालला आहे. याठिकाणी वेळीच उपाययोजना करावी अन्यथा दुर्घटना घडू शकते, अशी भीती वाहनचालकांमधून व्यक्त केली जात आहे.
करूळ घाट मार्ग 26 जुलैपर्यंत राहणार वाहतुकीला बंद
मुसळधार पावसामुळे वैभववाडी तालुक्यातील करूळ घाटातील दरीकडील बाजूने मोरी खचल्यामुळे रस्ता अधिकच खचत असल्यामुळे 26 जुलैपर्यंत करूळ घाटरस्ता वाहतुकीस पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हा मार्ग असून या मार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. कोकणला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा हा महत्त्वाचा घाट असून हा मार्ग सध्या बंद असल्याने वाहतुकीची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे ही वाहतूक भुईबावडा घाटातून वळविण्यात आली आहे.