सिंधुदुर्ग - जिल्ह्यात गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या चाकरमान्यांना डिवचण्याचे काम सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच व सरपंच संघटना करत आहे. खऱ्या अर्थाने हा वाद करण्याची गरजच नाही. चाकरमान्यांना किती दिवस क्वारंटाईन करायचं याचा निर्णय शासन घेईल. त्यामुळे सरपंच जे चाकरमानी आणि गावातील लोक यांच्यात जी दारी निर्मण करण्याचं काम करताहेत ते त्यांनी थांबवलं पाहिजे, असे मत मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी व्यक्त केले.
कणकवली येथे आपल्या निवास्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उप जिल्हाप्रमुख दया मेस्त्री उपस्थित होते. यावेळी बोलताना उपरकर पुढे म्हणाले, जिल्ह्यात कॉरंटाईन कालावधी संपल्यानंतरही काही पेशंट कोरोना पॉझिटिव्ह निघालेले आहेत. त्यामुळे आमची अशी मागणीआहे, की सात दिवसाचं क्वारंटाईन करा आणि ज्यांची घरे बंद आहेत, त्यांना त्यांच्या घरात पाठवा तिथे त्यांना क्वारंटाईन करा, ज्यांच्या घरात रहायला स्वतंत्र जागा आहे, अशांना त्यांच्या घरात क्वारंटाईन करा, ज्यांची व्यवस्था नाहीय त्यांना हॉटेलमध्ये राहू द्या, त्यातूनही कोणाची व्यवस्था होत नसेल तर त्यांना रूम क्वारंटाईन करा.
पुढे ते म्हणाले, की अशाप्रकारची मागणी होत असताना आता सरपंच संघटनांच्या भूमिकेमुळे गावचे नातेवाईक आणि चाकरमानी यांच्यात कटुता निर्माण होऊ लागली आहे. गाववाल्यांना आम्ही नको असू तर यावर्षीपासून आंखू मुंबईत गणपती बसवायचा काय ? असा विचार आता चाकरमानी करू लागले आहेत. असे झाले तर मुंबईतून सणानिमित्त गावाकडे येणारा चाकरमानी पुढच्या काळात गावाकडे पाठ फिरवेल. यातून तो गावातील नातेवाईकांबद्दल मनात राग ठेऊ शकतो, अशी भीतीदेखील त्यांनी व्यक्त केली.
मुंबईकर चाकरमान्यांची प्रशासनाने जिल्ह्याच्या सीमेवर तातडीची तपासणी करावी. जे संशयित वाटतील त्यांना क्वारंटाईन करावे. त्यांच्यावर उपचार सुरू करावेत आणि जे पॉझिटिव्ह येणार नाहीत त्यांना आपल्या गावी जाऊ द्यावे. गावात आल्यानंतर तो सात दिवस क्वारंटाईन होऊ देत. गणपती सणाशी चाकरमान्यांची भावना जोडलेली आहे. तेव्हा सरपंचानी नसता वाद न घालता चाकरमानी सुरक्षित गावी कसे पोहोचतील यासाठी शासनावर दबाव वाढवावा, असेही उपरकर म्हणाले.