सिंधुदुर्ग - जिल्हा परिषदेने राबवलेल्या 'उत्कर्षा' या मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रमाची 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'ने दखल घेतली आहे. संक्रांतीनिमित्त 24 जानेवारी 2019 ला हळदीकुंकवाचा कार्यक्रम घेऊन जिल्हा परिषदेने महिलांना 4 लाख 242 सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप केले होते. याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे.
सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक आणि प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. 30 जानेवारी 2020 ला 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'ने जिल्हाधिकारी कार्यालयाला याबाबत अधिकृत माहिती दिली.
हेही वाचा - महिलांवरील अत्याचार सुसंस्कृत महाराष्ट्रात सहन केले जाणार नाहीत'
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी 'उत्कर्षा' हा मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम जिल्ह्यात राबवण्याचा निर्णय घेतला होता. संपूर्ण जिल्ह्यात हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवला गेला. शेखर सिंह यांच्या बदलीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे के. मंजूलक्ष्मी यांनी स्वीकारली. त्यांनी देखील 'उत्कर्षा प्लस' नावाने ही चळवळ अधिक बळकट केली.
24 जानेवारी 2019 ला जिल्हा परिषदेसह आठ पंचायत समित्या आणि 431 ग्रामपंचायतीमधून एकाचवेळी हळदीकुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात 66 हजार 707 महिलांना 4 लाख 242 नॅपकिन वाण म्हणून देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या या अभिनव उपक्रमाची नोंद जागतिक आरोग्य संघटना (युनिसेफ) आणि लिम्का बूक ऑफ रेकॉर्डने घेतली, अशी माहिती सध्या जिल्हाधिकारी असलेल्या के. मंजूलक्ष्मी यांनी दिली.