सिंधुदुर्ग - केंद्र सरकारच्या इंधन दरवाढी विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. आज जिल्ह्यात इंधन दरवाढीविरोधात ठिकठिकाणी मोर्चा काढण्यात आला. कणकवलीत शिवसेना नेते संदेश पारकर आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या नेतृत्वात प्रांताधिकारी कार्यालयावर शिवसेनेने मोर्चा काढला.
मोर्चेकऱ्यांच्या हातात गाजर
या मोर्चात कार्यकर्ते बैलगाडी घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे मोर्चेकऱ्यांच्या हातात गाजर होते. गाजर दाखवत आणि केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणा देत हा मोर्चा कणकवली प्रांत कार्यालयावर धडकला. या मोर्चात शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, शैलेश भोगले, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, ॲडव्होकेट हर्षद गावडे, शेखर राणे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोदी-शहा हुकूमशाही पद्धतीने कारभार करत आहेत
यावेळी बोलताना शिवसेना नेते संदेश पारकर म्हणाले की, हे सरकार संपूर्ण देशावर जाचक आणि हुकूमशाही पद्धतीने कारभार करत आहे. केंद्राकडून भरमसाठ इंधन दरवाढ करण्यात आली आहे. गेले काही महिने शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. त्यात त्यांची कृषी कायदे मागे घ्या अशी प्रमुख मागणी आहे. मात्र त्यांच्या मागण्या सरकार मान्य करत नाही, शिवाय त्यांना काही उत्तरही देत नाही. त्यामुळे त्यांच्याही आंदोलनाला आम्ही या मोर्चातून पाठिंबा देत आहोत. मोदी-शहा सरकारच्या विरोधातील हा उद्रेक आता जनतेत उफाळून आला आहे. त्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. जोपर्यंत इंधन दरवाढ कमी होत नाही तोपर्यंत शिवसेना अशा प्रकारची आंदोलन करत राहणार असल्याचे संदेश पारकर यांनी म्हटले आहे.
अच्छे दिनाचे गाजर दाखवनाऱ्या मोदींचा निषेध
जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत म्हणाले की, मनमोहन सिंग सरकारच्या काळात जागतिक पातळीवर डॉलरचा रेट १०४ रुपये असताना बाजारात ६० रुपयापर्यंत डिझेलचे दर होते. मात्र तरी देखील भाजपचे नेते टीका करत होते. मात्र आता डॉलरचा दर ६० रुपये असताना पेट्रोलचा दर ९४ वर पोहोचला आहे. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आज हा मोर्चा काढण्यात आला आहे.
प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा
कणकवली शहरातील पटकीदेवी मंदिराजवळून हा मोर्चा निघाला. कणकवली बाजारपेठेतून महामार्गावरून हा मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकला. पोलिसांनी प्रांत कार्यालयाचे गेट आधीच बंद करून घेतले होते. मात्र शिवसैनिकांनी हे गेट उघडत एक बैलगाडी आतमध्ये घेतली. पोलिसांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र आक्रमक शिवसैनिकांनी गेट उघडले. यावेळी प्रांताधिकारी रजेवर असल्याने त्यांच्या वतीने कणकवली तहसीलदार रमेश पवार यांना निवेदन देण्यात आले.