सिंधुदुर्ग - अभियंता चिखलफेक प्रकरणी आमदार नितेश राणे आणि इतर स्वाभिमान कार्यकर्त्यांना शुक्रवारी कणकवली कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांच्यासह सर्व आरोपींना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे पुढील चार दिवस नितेश राणे यांचा मुक्काम पोलीस कोठडीत असणार आहे.
बुधवारी आमदार नितेश राणे आणि स्वाभिमान कार्यकर्त्यांनी हायवे प्राधिकरण उप-अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक करून त्यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर संध्याकाळी शेडेकर यांनी कुडाळ पोलीस स्थानकात याबाबत लेखी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रकरण कणकवली पोलीस स्थानकात वर्ग झाल्याने स्वतः नितेश राणे पोलीस स्थानकात हजर झाले. कणकवली पोलिसांनी नितेश आणि अन्य स्वाभिमान कार्यकर्त्यांना रात्री उशिरा अटक केली. त्यानंतर सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणी दरम्यान नितेश राणेंना डॉक्टरांनी रुग्णालयातच उपचारासाठी ठेवण्याचा सल्ला दिला. त्यामुळे गुरुवारची रात्र नितेश राणेंनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयातच काढली.
दरम्यान शुक्रवारी नितेश राणे आणि अन्य आरोपींना कणकवली कोर्टात हजर करण्यात आले. सरकारी पक्षाने गुन्ह्याच्या चौकशीसाठी सात दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती. मात्र न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली. त्यामुळे नितेश राणेंसह 18 आरोपींना न्यायालयाने 9 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सुनावणीच्या वेळी आमदार नितेश राणे देखील कोर्टात उपस्थित होते. कोर्टाच्या निकालानंतर त्यांनी नितेश राणे यांच्या कृत्याची पाठराखण केली. तसेच जनतेच्या प्रश्नासाठी एखादा लोकप्रतिनिधी आंदोलन करत असेल तर त्याला मत मिळू नये म्हणून पोलिसांचा वापर करून प्रकरणाला गंभीर बनवलं गेल्याचे सांगितले. राणे विरोधक आणि पालकमंत्री दीपक केसरकर राजकीय दबवाचा वापर करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.