सिंधुदुर्ग- सध्या जिल्ह्यात तापमान वाढ होऊ लागली आहे. अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. तापमानवाढीचे संकट आता हापूस आंब्याला लागले आहे. किनारपट्टी भागात ४० ते ४३ अंश सेल्सियस तापमान गेल्या दोन दिवसापासून असल्याचे आंबा बागायदारांनी सांगितले. परिणामी, उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात आंब्याची गळ होऊ लागली आहे.प्रखर उष्णतेमुळे आंबा जळून खाली पडत आहे. परिपक्व होत असलेला आंबा गळून पडत असल्याने आंबा उत्पादक शेकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच कातळावरील बागांना याचा अधिक फटका बसत आहे.
बदलत्या वातावरणाचा फटका, त्यात आंब्याचे उत्पन्न एक ते दोन महिन्यांनी उशिराने आले. त्यानंतर शेतकऱ्याला काहीशी आशा होती की आलेल्या मोहोरातून काहीतरी उत्पन्न मिळेल. मात्र, आंब्याचे फळ परिपक्व होत असतानाच कोरोनामुळे बाजारपेठा ठप्प झाल्या. त्यांनतर आता मे महिना उजाडला मात्र जिल्ह्यात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. उष्णता वाढल्याने आंब्याला ताण बसल्याने फळगळ मोठ्या प्रमाणात होत आहे. बदलते वातावरण, कोरोनाचे संकट आणि आता अतिउष्णता यामुळे आंबा बागायतदार हवालदिल झाला आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष द्यावे, तसेच या आंबा पिकाचा विमा काढलेला असल्याने विमा कंपन्यांनी याकडे लक्ष द्यावे. या नुकसानाची पाहणी करून विम्याच्या माध्यमातून सहकार्य करावं, अशी मागणी शेतकरी करत आहे.
कोरोनामुळे बाजारपेठ नाही. तसेच काजूचा भाव गडगडला आहे. आंबा, काजूच्या बागेतून शेतकऱ्यांचे वर्षांचं गणित अवलंबून असत. मात्र, यावर्षाची आर्थिक घडी विसकटल्याने मुलांचे शिक्षण, घरखर्च कसा भागणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन मार्ग काढावा, विमा कंपन्यानी नुकसान भरपाई द्यावी अथवा जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे पाऊल उचलतील, अशा भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. उष्णता वाढल्याने आंब्यामध्ये साका तयार होतो. आंब्याला डाग पडायला लागतात. मोठ्या प्रमाणात फळगळ होते. त्यामुळे आंब्याचे मोठे नुकसान होत आहे.