सिंधुदुर्ग - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी ( Sindhudurg District Central Cooperative Bank Election ) आज मतदान होत आहे. कणकवली मतदानकेंद्रात मतदार आल्यानंतर मतदारांशी सर्वजण संवाद साधत आहेत. उमेदवार सतीश सावंत केंद्र परिसरात थांबले होते. तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत देखील या मतदान केंद्र परिसरात होत्या. समोरासमोर आल्याने दोघांमध्येही जोरदार बाचाबाची झाली असून पोलिसांनी हस्तक्षेप करत हा वाद मिटवला आहे. मात्र, या प्रकाराची जोरदार चर्चा रंगली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर सरासरी 70 टक्के मतदान झाले आहे.
मोबाईलवरून झाला बाचाबाचीचा प्रकार -
कणकवलीत अत्यंत शांतपणे मतदान सुरू होते. मात्र, मतदान केंद्रांमध्ये मोबाईल आणायचे नाही असे ठरले असताना, सतीश सावंत यांच्या हातात मोबाईल पाहिल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी आक्षेप घेतला. यावरून दोघांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. कणकवली पोलिसांनी तात्काळ या बाचाबाचीत हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्रातून बाहेर जायला सांगितले.
पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला
मतदान केंद्रांमध्ये जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्यामध्ये बाचाबाची झाल्यानंतर कणकवली तहसीलदार कार्यालयाच्या गेटवर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू झाली. यावेळी शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने येऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरता कणकवली पोलिसांनी तात्काळ या ठिकाणचा पोलीस बंदोबस्त वाढविला. दंगल नियंत्रण पथकाच्या तब्बल पाच गाड्या या ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरी 70 टक्के मतदान
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 19 जागांसाठी 39 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन आणि महाविकास आघाडीचे पॅनेलप्रमुख सतीश सावंत हे शेती संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरुद्ध भाजपच्यावतीने विठ्ठल देसाई रिंगणात असून लक्षवेधी दुरंगी लढत आहे. या मतदारसंघात तिसरे उमेदवार सुशांत नाईक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने दुरंगी लढत होत आहे. नागरी सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघातून जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली आणि कणकवलीचे नगरसेवक सुशांत नाईक यांच्यात लढत होत आहे. आतापर्यंत 70 टक्के मतदान झाले आहे.
हेही वाचा - Kalichran Maharaj : कालीचरण महाराजांना अखेर बेड्या; छत्तीसगड आणि मध्य प्रदेश सरकार आमने-सामने