सिंधुदुर्ग - कोकण आणि घाटमाथ्यावरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कुडाळ तालुक्यातील सिद्ध महादेवाच्या यात्रेला कोरोनामुळे स्थगिती देण्यात आली आहे. दरवर्षी मे महिन्यात कोकण आणि घाटमाथ्यावरील लोकांना एकत्र आणणारे हे देवस्थान भाविकांनी गजबजून जाते. यंदा कोरोनामुळे ही सारी लगबग थांबलेली आहे.
तीनशे वर्षांपासून सुरू असलेल्या कुडाळमधील केरवडे गावातील सिद्ध महादेवाची यात्रा ही येथील लोक जीवनातील महत्त्वाचा दुवा आहे. गेल्या तीन शतकात पहिल्यांदाच भक्तांविना सिद्ध महादेवाचे मंदिर रिकामे दिसत आहे. सिद्ध महादेवाच्या यात्रेला दरवर्षी सात ते आठ लाख भाविक कोकण आणि घाटमाथ्यावरून येत असतात. हनुमान जयंती झाल्यानंतर सिद्ध महादेवाच्या यात्रेला सुरुवात होते.
एप्रिल व मे महिन्याच्या प्रत्येक सोमवारी येथे यात्रा भरते. रांगणा गडाच्या पायथ्याशी असलेल सिद्ध महादेवाला घाटमाथ्यावरील भक्त घाटातून चालत येतात. यावर्षी मात्र, कोरोनामुळे देश लॉकडाऊन झाल्याने या महादेवाच्या मंदिराकडे डोंगर दऱ्यातून येणाऱ्या वाटाही निर्मनुष्य झाल्या आहेत.