सिंधुदुर्ग - चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या या मागणीच्या भाजप आमदार नितेश राणे यांच्या ट्विटनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकारण तापले आहे. आमदार नितेश राणेंनी नामकरणाची चिंता करू नये. ज्यांनी बाळासाहेबांना त्रास दिला अशा गद्दारांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असे ट्विट करत शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी आमदार नितेश राणे यांच्यासह राणे कुटुंबियांवर निशाणा साधला आहे.
आमदार वैभव नाईक यांनी ट्विट करत राणेंचा घेतला समाचार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग दौऱयावर आले त्याचवेळी सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी खासदार विनायक राऊत यांनी केलेली आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी टर्मिनला शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असे नाव दिले. त्याचप्रमाणे शिवसेना चिपी विमानतळाला देखील नाव देणार आहे. त्यामुळे आमदार नितेश राणेंनी चिपी विमानतळाच्या नामकरणाची चिंता करू नये. ज्यांनी बाळासाहेबांना त्रास दिला अशा गद्दारांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही अशी खरमरीत टीका आमदार वैभव नाईक यांनी आमदार नितेश राणेंवर केली आहे.
बाळासाहेबांचे नाव घेऊन आपले राजकीय अस्तित्व पणाला लावण्याचा राणेंचा प्रयत्न
नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर बाळासाहेब व शिवसेना पक्षाला त्रास देण्याचे काम त्यांनी केले आहे. शिवसेना संपविण्याची भूमिका त्यांनी घेतली. सिंधुदुर्गात दहशत माजवली मात्र शिवसैनिकांनी टोकाचा संघर्ष करत राणेंचे सगळे वार परतून लावले. त्यानंतर शिवसैनिकांनी राणेंची काय अवस्था केली याची जाणीव राणेंना आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे नाव घेऊन आपले राजकीय अस्तित्व पणाला लावण्याचा राणेंचा प्रयत्न आहे. मात्र सिंधुदुर्गाची जनता राणेंच्या या कुरघोडयांना ओळखून आहे. प्रत्येक कामात खोडा घालणारे राणे आता चिपी विमानतळ पूर्ण होत असताना त्याचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहेत.परंतु सिंधुदुर्गच्या जनतेसमोर खोटेनाटे चालत नाही याची जाणीव राणेंनी ठेवावी. असेही यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले.
राणेंनी कडवट शिवसैनिक असल्याची घेतलेली भूमिका हास्यास्पद
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चिपी विमानतळ हे मोठे प्रकल्प उभारायला राणेंना जमले नाहीत ते शिवसेनेच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत. त्यामुळे दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे श्रेय राणेंनी घेण्याची धडपड करू नये. राणेंनी कडवट शिवसैनिक असल्याची घेतलेली भूमीका हास्यास्पद आहे. निवडून येण्यासाठी आणि सत्तेसाठी या-ना-त्या राजकीय पक्षांमध्ये प्रवेश करणाऱ्यांना हे शोभत नाही. असा घणाघात आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.