सिंधुदुर्ग - सावंतवाडी बाजारपेठेत येणारा भाजीपाला, धान्यसाठा, दूध, फळे बेळगाव, संकेश्वर, कोल्हापूर या भागातून येत आहेत. कोल्हापूर, बेळगाव, संकेश्वर भागात कोरोनाबाधित रुग्ण बऱ्याच प्रमाणात आढळले आहेत. त्यामुळे या मार्गावरुन येणाऱ्या वाहनांच्या तपासणीसाठी आंबोली बाजारपेठेत असलेली पोलीस तपासणी चौकी आजरा फाटा येथे सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेचे सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी मुळीक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
‘कोरोना’ संसर्गाने राज्यासह संपूर्ण देशासह थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याने स्वत:ला ‘कोरोना’मुक्त ठेवण्यात यश मिळवले आहे. मात्र, बेळगाव, संकेश्वर, कोल्हापूर या भागातून येणाऱ्या वाहनातून अनोळखी प्रवासी, चालक हा‘कोरोना’बाधित असू शकतो. आंबोली नाक्यावर तपासणी करताना त्याचा फटका पोलीस, आंबोली ग्रामस्थ, सावंतवाडीकरांना बसू शकतो. त्यामुळे आंबोली बाजारपेठेत असलेली पोलीस चौकी आजार फाटा येथे न्यावी, असे मागणीपर निवेदन शिवसेनेचे सावंतवाडी तालुका प्रमुख राऊळ यांच्यावतीने पोलीस उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.
याशिवाय ‘रेड झोन’मधून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी, तसेच कोरोना विरोधातील लढ्यात सरकारी नियमांचे पालन होते की नाही, याची पाहणी करावी. बेळगाव, संकेश्वरमधून भाजीपाला आणणाऱ्यांची आरोग्य तपासणी करावी, अशी मागणीही राऊळ यांनी केली आहे. यावेळी नगरसेवक बाबू कुडतरकरही उपस्थित होते.