सिंधुदुर्ग - घटस्थापनेच्या मुहूर्तावर शिवसेना पक्षाने विधानसभा निवडणूक २०१९ साठी पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली. या पहिल्याच यादीत सिंधुदुर्गातून वैभव नाईक आणि दीपक केसरकर यांना स्थान मिळाले. दोघांनाही मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म दिला. दरम्यान ३ ऑक्टोबरला हे दोघेही आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.
२०१४ साली नारायण राणेंचा मोठ्या मताधिक्याने पराभव करून वैभव नाईक हे जाईन्ट किलर ठरले होते. तर सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर विक्रमी मताधिक्याने निवडून आले. म्हणूनच केसरकर यांच्यावर उद्धव ठाकरेंनी गृहराज्य मंत्री पदाची जबाबदारी टाकली होती. दोघांनीही जिल्ह्यात राणेंना समर्थपणे टक्कर दिली आहे. म्हणूनच नाईक यांची कुडाळ-मालवण मधून आणि केसरकर यांची सावंतवाडी-वेंगुर्ला विधानसभा मतदारसंघातून उमेदारी निश्चित होती. दरम्यान आजही तळकोकणात शिवसेना विरुद्ध राणे असाच संघर्ष आहे. त्यामुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीत याठिकाणी चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे.