सिंधुदुर्ग - नारायण राणेंच्या भाजप प्रवेशानंतर शिवसेना काय भूमिका घेणार, यावर उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र, शिवसेना स्टाईलने आक्रमक वक्तव्ये न करता उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंविषयी भाजपला सावधानतेचा इशारा दिला आहे. राणे जिथे जातील त्या पक्षाची वाताहात होते. काँग्रेसची वाट लावली, स्वत:चा पक्ष काढला त्याची वाताहात झाली आणि आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असे म्हणत ठाकरेंनी भाजपचीही राणेंमुळे वाताहात होऊ शकते, असे अप्रत्यक्ष सांगण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा - 'मित्रपक्षांचा भाजपने वापर केला, आता फेकून द्यायचे काम केले सुरू'
मित्राच्या घरात चोर शिरत असेल तर त्याला वेळीच सतर्क करणे ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे मी भाजपला सावध करण्यासाठी इथे आलोय. भाजपच्या भल्यासाठी राणेंना दूर करा, असे म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंनी भाजपला इशारा दिला. राज्यात सेना-भाजपची युती असली तरी कोकणात मात्र, भाजप आणि शिवसेना यांच्यातच खरी लढत होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नारायण राणेंचा लांबवणीवर पडलेला पक्षप्रवेश निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्गात येऊन करवून घेतला होता. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेची उत्सुकता लागली होती.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, पाठीत वार करणारी औलाद सोबत नको. नारायण राणे हे केवळ सत्तेसाठी हपापले आहेत. इकडे वाकोबा, तिकडे वाकोबा आणि म्हणे आम्ही स्वाभिमान, हा कसला स्वाभिमान? करून करून भागले आणि राणे देवपूजेला लागले आहेत, असे म्हणत ठाकरे यांनी राणे पिता-पुत्रांवर सडकून टीका केली. भाजपमध्ये चांगली मंडळी असताना नको त्यांना उमेदवारी का दिली? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा - 'या' मंत्र्यांना निवडणूक जाणार अवघड? तर, काही नेतेही अडचणीत?
कणकवली विधानसभा मतदारसंघातील एकूण मतांपैकी ७० टक्के मते भाजपचे उमेदवार नितेश राणे यांना मिळतील. इतर सगळ्या उमेदवारांना मिळून ३० टक्के मते मिळतील. हे माझं भाकीत आहे. तुम्ही डायरीत लिहून घ्या, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुदुर्गमधील सभेत व्यक्त केला होता. त्यावर उद्धव ठाकरेंनी त्यांचे भाकित व्यक्त केल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे. कणकवली मतदारसंघात नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे भाजपच्या तिकीटावर लढत आहेत. तर त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून सतीश सावंत रिंगणात आहेत.