सिंधुदुर्ग - राज्य सरकारने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळा अर्थात मॉडेल स्कूल म्हणून राज्यातील 300 शाळांमध्ये पाच शाळांची निवड केली आहे. पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असणाऱ्या शाळांची निवड केली आहे. मुलांचा शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकास ही प्रमुख उद्दिष्ट्ये यामागे असून क्रीडा, भाषण, लेखन, अभिनय, गायन व विविध क्षेत्रातील कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न "आदर्श शाळा' संकल्पनेतून होणार आहे.
आदर्श शाळा निर्मितिमध्ये भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि काही प्रशासकीय बाबी यांचा समावेश करण्यात आला आहे. 21 व्या शतकातील कौशल्य नवनिर्मितिला चालना देणारे आहे. समीक्षात्मक, वैज्ञानिक प्रवृत्ती, संविधानिक मूल्य अंगीकारणे, काम करण्याचे कौशल्य आणि संभाषण कौशल्य यासारखी कौशल्य विकसित करणारा काळ आहे. नेमक्या याच गोष्टीला यात प्राधान्य देण्यात आली आहे. त्यामुळे या आदर्श शाळेकडे अन्य पालक आकर्षित होऊन आपल्या पाल्यांना या शाळेत प्रवेश देतील. तसेच या शाळेच्या सर्वांगीण गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक उपक्रमात सहभाग घेतील, असा विश्वास महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी आदेशात व्यक्त केला आहे.
पुस्तकी ज्ञानाच्या पुढे जावून मुलांना शिक्षण
आदर्श शाळेत शनिवार व रविवारी सुद्धा विद्यार्थ्यांना यावेसे वाटले पाहिजे, असे प्रसन्न वातावरण तयार करण्यात येणार आहे. शाळेत आनंददायी शिक्षणाचा अनुभव मिळणार आहे. विद्यार्थ्यांना कृतियुक्त शिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थी स्वतः ज्ञानाची निर्मिती करतील. रचनात्मक व आनंददायी कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त शिक्षण अवगत करतील. पुस्तकी ज्ञानाच्या पुढे जावून मुलांना शिक्षण मिळेल. न घाबरता विद्यार्थी प्रश्न विचारण्यास उत्सुक असतील. विद्यार्थ्यांमध्ये विविध विषयातील अध्ययन फलनिष्पतीसह त्यांना विकसित करण्याचे उपक्रम राबविले जाणार आहेत. ही शाळा अन्य शाळांना प्रेरणा व मार्गदर्शन करण्याचे काम करणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील "स्कूल कॉम्प्लेक्स' या संकल्पने प्रमाणे या शाळेतून अन्य शाळातील शिक्षक व विद्यार्थी शैक्षणिक सुविधांचा लाभ घेता येणार आहे. भविष्यात टप्या टप्याने या शाळेत दाखल मुलांसाठी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद आहे.
भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार
स्वतंत्र शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुस्थितीत असलेले वर्ग, आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, आयसिटी लॅंब, सायन्स लॅब, ग्रंथालय या भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आजूबाजूच्या गावांपासून दळणवळणासाठी रस्ते केले जाणार आहेत. शैक्षणिक सुविधेमध्ये विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक पोषण वातावरण निर्माण केले जाणार आहे. पाठ्यपुस्तकापलीकडे जावून शिक्षक ज्ञानदान करणार आहेत. वर्गात उभे राहून वाचनावर भर दिला जाणार आहे. भाषा, गणित यातील वाचन, लेखन आणि गणितीय क्रिया अवगत करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. ग्रंथालयात पूरक वाचनीय पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार असून संदर्भ ग्रंथ, इनसायक्लोपीडिया उपलब्ध केले जाणार आहेत. स्वयं अध्ययनाबरोबरच गट अध्ययनासारखे रचनात्मक उपक्रम राबविले जाणार आहेत.
या शाळांचा समावेश
देवगड तालुक्यातील जामसांडे क्रमांक 1, दोडामार्ग तालुक्यातील श्री सातेरी जिल्हा परिषद केंद्र शाळा साटेली-भेडशी, कणकवली तालुक्यातील खारेपाटण क्रमांक 1, कुडाळ तालुक्यातील पावशी नं 1, मालवण तालुक्यातील आचरा क्रमांक 1 या पाच शाळांची निवड आदर्श शाळेसाठी करण्यात आली आहे. वैभववाडी तालुक्यातील लोरे शाळेचा समावेश केला होता; मात्र, या शाळेने लेखी पत्र देत आदर्श शाळा उपक्रम नाकारला आहे. याबाबत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य 10 नोव्हेंबरपर्यंत शासनाला कळविणार आहेत. त्या बदल्यात जिल्ह्यातील दुसरी शाळा घेतली जाणार आहे. बदल असल्यास शासनाने 10 नोव्हेबरपर्यंत कळविण्यासाठी मुदत दिली आहे.