सिंधुदुर्ग - जिल्ह्यात सोमवारपासून अखेर शाळा सुरू झाल्या. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. काही शाळांमधील शिक्षकांच्या कोरोना चाचण्या झालेल्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील 30 टक्के शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत.
जिल्ह्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाले. कणकवली देवगड, वैभववाडी या तीन तालुक्यातून विद्यार्थी येथे येतात. इयत्ता 9 वी ते 12 पर्यंत येथे 861 विद्यार्थी शिकतात. त्यापैकी 65 टक्के विद्यार्थी उपस्थित होते.
पालकांच्या संमतीपत्रासह विद्यार्थी शाळेत -
एका बेंचवर एक याप्रमाणे विद्यार्थ्यांना बसविण्यात आले होते. प्रत्येकाच्या तोंडावर मास्क आणि बॅगेत सॅनिटायजरची बॉटल होती. एकमेकांपासून 6 फुटाचे अंतर ठेवून विद्यार्थी शाळेत आले आणि शाळा सुटल्यावर त्याच पद्धतीने घरी गेलेत. विशेष म्हणजे संस्था चालक स्वतः उपस्थित राहून मुलांना सूचना देत होते. पालकांची संमतीपत्र घेऊन मुलांना शाळेत घेण्यात आले आहे.
नेटवर्क नीट नसल्याने ऑनलाइन अभ्यासात येत होत्या अडचणी -
आजच्या या वर्षातल्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या मनात चांगलाच उत्साह दिसून आला. ऑनलाइन अभ्यासात अनेक अडचणी येत असल्याने आम्हाला शाळा सुरू झाल्याचा खूपच आनंद झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. वर्गात शिकताना समोर शिक्षक असतात तर ऑनलाइन वेळी नेट व्यवस्थित मिळत नसल्याने आपल्या शंका विचारता येत नाहीत. त्यामुळे आम्हाला शाळा सुरू झाल्याचा आनंद झाल्याचे विद्यार्थी म्हणाले. तर घरात एकच मोबाईल त्यात आईवडील कामावरून आल्यावर तो मिळायचा त्यात दोघांचा एकाच मोबाईलवर अभ्यास व्हायचा नाही. त्यात नेट व्यवस्थित मिळालं नाही की अडचण व्हायची. असेही काही विद्यार्थी म्हणाले.
पालकांनी व्यक्त केला आनंद -
शाळा सुरू झाल्यामुळे पालकही आनंदी असल्याचे येथे दिसून आले. आमच्या मुलांना आम्ही आनंदाने शाळेत पाठवले आहे. त्यांना कोरोना बाबत कोणती काळजी घ्यायची हे आम्ही सांगितले आहे. घरी मोबाईलवर मुलांचा अभ्यास होत नाही त्यामुळे शाळा सुरू झाल्या हे चांगलं झाल्याचं पालकांचं मत आहे.
दरम्यान जिल्ह्यात अजूनही काही शिक्षकांच्या कोरोना चाचण्या झालेल्या नाहीत. तर अजून काहींचे रिपोर्ट यायचे आहेत. त्यामुळे 30 टक्के शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत.
हेही वाचा - पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा संमिश्र प्रतिसाद; राज्यातील शाळांचा आढावा...
हेही वाचा - ऑनलाइन क्लासेसला दांडी मारणाऱ्या शिक्षकांना 'शिक्षा'... डिसेंबरपासून सक्तीची हजेरी