सिंधुदुर्ग- जिल्ह्यातील सावंतवाडी येथून बिहार, झारखंड येथे जाणाऱ्या मजुरांच्या परतीच्या व्यवस्थेसाठी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाची पूर्ण टीम शुक्रवारी एसटी बस स्थानकात तळ ठोकून होती. तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या जाण्याची सर्व व्यवस्था करणे अत्यंत काटेकोरपणे सुरू होते.
सावंतवाडी येथून आज 500 मजूर एसटी बसने सिंधुदुर्गनगरी येथे रवाना झाले. सिंधुदुर्ग येथून हे मजूर श्रमिक विशेष रेल्वेने झारखंड आणि बिहार येथे रवाना झाले. या मजुरांना सावंतवाडी एसटी बस स्थानकात पास देण्यात आले. सावंतवाडी न्यायालयाच्या माध्यमातून विधिसेवा समितीने या मजुरांना खाऊ व पाण्याचे वाटप केले. तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या देखरेखीखाली ही व्यवस्था राबत होती.
लॉकडाऊनमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अडकलेल्या इतर राज्यातील मजुरांना विशेष श्रमिक रेल्वेने पाठवण्यात आले आहे. कर्नाटक आणि झारखंड राज्यात यापूर्वी सिंधुदर्ग जिल्ह्यातून श्रमिक रेल्वे मजुरांना घेऊन रवाना झाल्या आहेत. कर्नाटक राज्यात 1500 मजूर विशेष रेल्वेने परत गेले तर झारखंड राज्यात 1545 प्रवासी रेल्वेने रवाना झाले आहेत.