सिंधुदुर्ग- जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पर्यटन स्थळावर येण्यास बंदी घातली आहे. यामुळे रविवारी आंबोली येथे आलेल्या अनेक पर्यटकांना सावंतवाडी पोलिसांनी माघारी पाठवले. यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला. वर्षा पर्यटनाच्या हंगामात पर्यटनाला बंदी असल्याने व्यावसायिकांचे मात्र नुकसान होत आहे.
पावसाळा आला की वर्षा पर्यटनासाठी जिल्ह्यात पर्यटकांची एकच गर्दी होते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाण असलेल्या आंबोलीतील धबधब्याजवळ पर्यटकांना पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. पर्यटनस्थळावर रविवार असल्याने पर्यटक येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला असल्याने सावंतवाडी पोलिसांकडून आंबोली येथील विविध भागातील पर्यटनस्थळावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरवर्षी आंबोलीमध्ये गोवा, कर्नाटक, कोल्हापूर, सांगली यांसह सिंधुदुर्गातील पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होतात. गेल्या काही दिवसांपासून आंबोलीतील पर्यटनस्थळावर वर्षा पर्यटनानिमित्त गर्दी झाली होती.यामुळे जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी तातडीने आदेश जारी करत जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी घातली. मात्र,रविवारी आंबोली येथे बरेच पर्यटक दाखल झाले होते.
सकाळच्या सुमारास काही पर्यटकांच्या गाड्याही आंबोली घाट परिसरात दिसून येत होत्या. यावेळी तेथे पेट्रोलिंगसाठी असलेल्या पोलिसांनी तातडीने त्यांना सूचना देत माघारी पाठवले. यावेळी पर्यटकांवर कारवाई करण्यात आली नाही. मात्र, यापुढे आंबोली घाटात दाखल होणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांनी दिली.