सिंधुदुर्ग - पर्यटकांसाठी आकर्षण असलेले जिल्ह्यातील रॉयल फुलपाखरू उद्यान सुरू करण्यात आले आहे. विविध जातींची फुलपाखरे पाहण्यासाठी पर्यटकांनी उद्यानात गर्दी केली आहे. प्रविण देसाई यांनी चार वर्षांपूर्वी या रॉयल फुलपाखरू उद्यानाची निर्मिती केली. पावसाळ्यात पर्यटक इथे बेडूक आणि साप पहायला येतात. मात्र आता फुलपाखरे पाहण्यासाठी येत असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या काळात पर्यटन बंद होते, मात्र आता पुन्हा एकदा पर्यटनाला सुरुवात झाल्याने पर्यटक या ठिकाणी येत आहेत.
आकर्षक रंगसंगतीने मोहिनी घालणाऱ्या फुलपाखरांच्या शेकडो प्रजाती पश्चिम घाटात आढळतात. आंबोलीमध्ये तर फुलपाखरांचा सर्वाधिक अभ्यास झाला असून, तिथे जगातील आकाराने सर्वांत मोठे ‘सदर्न बर्ड विंग' आणि सर्वात लहान ‘ग्रास ज्वेल’ फुलपाखरू आढळून आले आहे. फुलपाखरांच्या संवर्धनासाठी सरकार देखील प्रयत्न करत आहे. दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने ‘ब्ल्यू मॉरमॉन’ या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा प्रदान केला आहे. राज्य फुलपाखरू घोषित करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरले आहे. या फुलपाखरांच्या विविध जातींचे संवर्धन व्हायला पाहिजे, यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडासे गावात प्रविण देसाई यांनी खास फुलपाखरांसाठी उद्यान सुरू केले आहे. त्यांच्या उद्यानामध्ये विविध जातीची फुलपाखरे आढळतात.
भारतात फुलपाखरांच्या 1 हजार 320 प्रजाती
जगभरात फुलपाखरांच्या 18 हजार प्रजाती आढळतात. त्यापैकी 1 हजार 320 प्रजाती आपल्या देशात आढळतात. ईशान्येकडील राज्यांमध्ये फुलपाखरांचे वैविध्य सर्वाधिक आहे. सिक्कीममध्ये सातशेहून अधिक प्रकारची फुलपाखरे आढळतात. पश्चिम घाटात 339 प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजाती आढळतात. महाराष्ट्रात 215 प्रकारची, गोव्यात 254, कर्नाटकात 270, तर केरळमध्ये 285 प्रकारच्या फुलपाखरांची नोंद झाली आहे. पुण्यामध्ये आतापर्यंत फुलपाखरांच्या 140 प्रजाती आढळून आल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात फुलपाखरांची तस्करी
दरम्यान वन्य प्राण्यांसोबतच फुलपाखरांना देखील काळ्या बाजारात मोठी मागणी असते. आंतरराष्ट्रीय बाजारात फुलपाखरांची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे, अनेक फुलपाखरांच्या जातीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. भारताच्या ईशान्येकडील राज्यांतून मोठ्या प्रमाणात फुलपाखरांची तस्करी होते. थायलंड, मलेशियासह या सारख्या देशांमध्ये ही फुलपाखरे विकली जातात.
हेही वाचा - चिंताजनक.. महाराष्ट्रात सलग चौथ्या दिवशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाच हजारांच्या वर
हेही वाचा - भारती सिंहनंतर पती हर्ष लिंबाचियालाही एनसीबीने केली अटक, आज न्यायालयात हजर करणार