सिंधुदुर्ग - जिल्ह्यात गुरुवारी सर्वत्रदूर मुसळधार पाऊस झाला. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला असून शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. कुडाळ तालुक्यातील आंबेरी पुलावर पाणी आल्याने आसपासच्या 27 गावांचा संपर्क तुटला आहे.
जिल्ह्यात मालवण तालुक्यात सर्वाधिक 197 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर संपूर्ण जिल्ह्यात 927.8 मिमी पाऊस झाला. सिंधुदुर्गमध्ये एक जूनपासून आत्तापर्यंत एकूण 1 हजार 425.8 मि.मी. एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी अजूनही पावसाची सततधार सुरूच आहे. कुडाळ-माणगाव येथील ब्रिटिशकालीन आंबेरी पूल पाण्याखाली गेला आहे.
कणकवली शहरातून वाहणाऱ्या गड आणि जाणवली नद्यांचीही पाणी पातळी वाढली आहे. या पावसामुळे महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या लॉकडाऊन आहे. वाहतूक तुरळक प्रमाणात सुरू असल्याने फारशी समस्या निर्माण झाली नाही.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गमध्ये पावसाळी पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे. आंबोली येथील पर्यटन स्थळावरील बंदोबस्तामध्ये आणखीन वाढ करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक पोलिसांसह दंगल नियंत्रण पथक, वाहतूक शाखा, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस कर्मचारीही घाट परिसरात तैनात आहेत. आत्तापर्यंत जवळपास सहा जणांवर कारवाई करण्यात आली असल्याचे पालिसांनी सांगितले.