सिंधुदुर्ग - गाळेल येथे डोंगर कोसळून मातीच्या ढिगाऱ्यात एक युवक त्याच्या गाडीसह गाढला गेल्याची घटना घडली आहे. त्या युवकाचा शोध घेण्याचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी १ पोकलँड व तीन जेसीबी मशीनच्या साहाय्याने ही शोधमोहीम सुरू आहे. दरम्यान जोपर्यंत ढिगाऱ्याखाली गाडला गेलेला तरुण सापडत नाही तोपर्यंत मदतकार्य थांबवणार नाही, असे सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सांगितले आहे.
मेटल डिटेक्टरद्वारे गाडीचा शोध सुरू
सुमारे दोन एकरहून अधिक भागातील डोंगर कोसळून खाली आल्याने त्या युवकाचा शोध घेण्याचे कठीण आवाहन प्रशासनाच्या समोर आहे. पोलिसांचे बॉम्ब शोधक पथकाचे कर्मचारी देखील दाखल झाले आहेत. मेटल डिटेक्टरद्वारे त्याच्या गाडीचा शोध सुरू करण्यात आला आहे. एनडीआरएफच्या २१ जवानांची एक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. मात्र, त्याठिकाणची मोठ्या प्रमाणात आलेली माती बाजूला हटविली गेल्यावरच आमचं काम सुरू होणार असल्याची माहिती एनडीआरएफचे टीम कमांडर प्रभातकुमार यादव यांनी दिली आहे. सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे, नायब तहसीलदार प्रदीप पवार, पोलीस निरीक्षक अनिल जाधव, महसूल मंडळ अधिकारी आर व्ही राणे, तलाठी वर्षा नाडकर्णी, बांधकाम खात्याचे सहायक अभियंता अमित कल्याणकर आदी घटनास्थळी ठाण मांडून आहेत.
