सिंधुदुर्ग - कणकवली शहरातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्ग उड्डाण पुलाच्या संरक्षण भिंतीचे सिमेंट ब्लॉक सरकले असून, ही भिंत केव्हाही कोसळेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ठेकेदाराने या भिंतीला बाहेरून सपोर्ट देत मलमपट्टी करायला सुरुवात केली आहे. या भिंतीसमोर असलेले महाविद्यालय, लोकवस्ती आणि या ठिकाणी असलेली सततची वर्दळ लक्षात घेता अपघात झाल्यास मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत ठेकेदार गांभीर्याने लक्ष देत नसून, कणकवलीत प्रतिष्ठित नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे ही भिंत पाडून नव्याने उभारावी अशी मागणी कणकवलीकर नागरिक करत आहेत.
कणकवलीतील राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष अबिद नाईक म्हणाले, संरक्षण भिंतीसाठी लावलेले सिमेंटचे सर्व ब्लॉक निसटले आहेत. हे ब्लॉक टिकून रहावेत म्हणून ठेकेदार या भिंतीला बाहेरून मलमपट्टी करत आहे. मात्र, प्रत्यक्षात या मार्गावरून वाहतूक सुरु होईल तेव्हा वाहनांच्या वजनाने या भिंतीला मोठा धोका निर्माण होणार आहे. आपण याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार शरद पवार यांचे लक्ष वेधले आहे, असेही नाईक म्हणाले. या भिंतीसमोर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे केंद्र असलेले एस.एम. हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज आहे. या ठिकाणी दीड हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात. अजून कोकणात म्हणावा तसा पाऊस सुरू झालेला नाही. पहिल्या पावसात ही स्थिती आहे. उद्या जर का मोठ्या पावसात काही अपघात झाला आणि यावेळी महाविद्यालय सुरू असेल तर मुलांच्या जीवितास धोका संभवू शकतो, असे मत रुपेश जाधव यांनी व्यक्त केले. जाधव हे विद्यार्थी संघटनेचे नेते आहेत. ही भिंत पडून नव्याने बांधावी अन्यथा आपण राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेसोबत सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांना घेऊन आंदोलन करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
मनसेचे राज्य सरचिटणीस व माजी आमदार परशुराम उपरकर यांनी हा मुद्दा मांडला. या महामार्गाच्या कामाची क्वालिटी चेक करण्यासाठी नागपूर येथील आरटी क्राफ्ट नावाच्या कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. या कंपनीचे आणि ठेकेदार कंपनीचे साटेलोटं आहे. या कंपनीने १७ कोटींचे काम ठेकेदार कंपनीला ३४ कोटीला यापूर्वी रेकॉर्ड करून दिलेले आहे, असे उपरकर यांनी सांगितले. जाणवली नदीवरील पुलाचा स्लॅब ओतल्यावर १० दिवसाच्या आधीच स्लॅबसाठी खाली लावलेले आधाराचे खांब पाण्यात वाहून गेले. त्यामुळे हा स्लॅब कमकुवत झाला आहे. भविष्यात सावित्री नदीसारखी घटना येथे घडू शकते, असा धोक्याचा इशाराही उपरकर यांनी दिला आहे.
सध्या ठेकेदार कंपनीने ज्या ठिकाणी भिंत बाहेर आली आहे, त्याठिकाणी बाहेरून आधारासाठी भिंत उभारायला सुरुवात केली आहे. परंतु, हा आधार कितपत टिकतो हे येणाऱ्या काळातच कळेल.