सिंधुदुर्ग - जिल्हा बँक ही सर्वसामान्यांची आणि शेतकऱ्यांची आहे. त्यांच्या हितासाठी आम्ही उपक्रम राबवणार आहोत. शेतकऱ्यांची स्थिती सुधारावी यासाठी शेतीपूरक उद्योगधंदे निर्माण करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. तसेच इथून पुढे बारामतीला कारखान्यासाठी कर्ज दिले जाणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केले आहे. शिवाय जिल्हा बँक आम्ही जिंकली आता आमचे लक्ष महाराष्ट्राच्या सत्तेकडे आहेत, असे नारायण राणे म्हणाले. कणकवली येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
'सिंधुदुर्ग जिल्हा बँक जिंकली, आता लक्ष महाराष्ट्राच्या सत्तेकडे'
जिल्हा बँक आम्ही जिंकली आता आमचे लक्ष महाराष्ट्राच्या सत्तेकडे आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज येथे केले. तसेच आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे यांच्यासह भाजपाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे जिल्हा बँकवर यश मिळवता आले, असेही ते यावेळी म्हणाले. जिल्हा बँकेनंतर आता आमचे लक्ष महाराष्ट्राच्या सत्तेकडे असणार आहे. दरम्यान जिल्हा बँकेवर विजय मिळविताना अक्कलेचा वापर झाला. ज्यांना अक्कल आहे. त्यांच्या ताब्यात जिल्हा बँक आलेली आहे, असेही राणे म्हणाले.
'राजन तेलींचा निर्णय पक्षपातळीवर होईल'
भाजपा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा राजन तेली यांनी दिला आहे. मात्र त्यांचा राजीनामा स्वीकारायचा, की नाही याबाबतचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ मंडळी घेतील आणि तो निर्णय आम्हाला मान्य असेल, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज स्पष्ट केले. तसेच ज्यांना ३६ मत मिळू शकत नाहीत, त्यांनी विधानसभेच्या गोष्टी करू नयेत, असेही ते म्हणाले. आमची दिल्लीपर्यंत सत्ता आहे. त्यामुळे भविष्यात राजनची वर्णी लावू. राजन तेली यांनी आपला राजीनामा वरिष्ठांकडे दिला असेल आणि वरिष्ठ त्याबाबतचा निर्णय घेतील. ही निवडणूक आमचे विरोधक जबरदस्तीने आणि कायद्याचा वापर करून जिंकायचा प्रयत्न करत होते. पोलीस यंत्रणाही वापरली. नीतेश राणेंचा जामीन अर्ज चार चार दिवस चालतो? गेल्या पन्नास वर्षाच्या राजकारणात आम्ही हे कधी पाहिले नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी डीजी, ॲडिशनल डीजी येतात. जिल्हा बॅकेच्या निवडणुकीत तीन पक्ष एकत्र आले तरीही त्यांना आम्ही पराभवाचा धडा दिला असेही राणे म्हणाले.
हेही वाचा - Jayant Patil Resolution 2022 : 'जलसंधारणाचे नवीन प्रकल्प राबवण्यावर भर देणार'