सुंधुदुर्ग - मुंबई-गोवा महामार्गावर एका चालत्या लक्झरी बसने अचानक पेट घेतला. ही घटना सिंधुदुर्गनगरी मुख्यालयाजवळ हुमरमळा येथे मध्यरात्री १ वाजता घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही प्रवाशांचे सामान आणि बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची वातानुकूलित लक्झरी बस गोव्याहून-मुंबईकडे निघाली होती. कुडाळ सोडून काही अतंर पुढे गेल्यानंतर बसमधून अचानक धूर येऊ लागला. ही बाब लक्षात येताच चालकाने हूमरमळा येथे बस थांबवली. तोपर्यत बसमधून येणारा धूर वाढत होता. घटनेचे गांभीर्य पाहून प्रथम बसमधील अंदाजे ४० प्रवासी आणि त्यांचे सामान बाहेर काढण्यात आले. मात्र त्यानंतर बसने काही क्षणातच पेट घेतला. ही आग विझवण्यासाठी कुडाळमधील अग्निशमन बंब मागवण्यात आले. मात्र ते येण्यास फार उशीर झाल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. बस चालकाच्या प्रसंगावधनाने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे महामार्ग काही काळासाठी ठप्प झाला होता.