सिंधुदुर्ग - आपल्या कर्तव्यापेक्षा काहीच मोठे नाही हे मानणाऱ्या काही व्यक्ती समाजात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वागदे येथील आशा सेविका श्रद्धा गावडे यांनी हे सिद्ध करुन दाखवले आहे. कोरोनाच्या संकटात प्रसूतीची तारीख अवघी दोन दिवसांवर असताना आशा स्वयंसेविका श्रद्धा गावडे यांच्यावर सर्वेक्षणाची जबाबदारी येऊन पडली. त्यांनी माघार न घेता सर्वक्षण पूर्ण केले.
आपल्या गरोदर असण्याचे कारण पुढे करून श्रद्धा ही जबाबदारी टाळू शकल्या असत्या. मात्र, परिस्थिती बघून श्रद्धा कोरोनाच्या लढ्यात उतरल्या. त्यांनी आपले काम चोख बजावले. अगदी आपल्या प्रसूतीच्या काही तास अगोदरपर्यंत त्या काम करत होत्या. त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने गरोदर महिलांना सावधानतेचा इशारा दिला असताना गावडे यांनी घरोघरी जाऊन कोरोना विषयी जनजागृती व सर्वेक्षण केले. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.