सिंधुदुर्ग - कणकवलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कणकवली नगरपंचायतीने शहरात २० सप्टेंबर ते २७ सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू लागू केला आहे. या कर्फ्यूला आजपासून सुरुवात झाली. शहरातील नागरिकांनी याला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. मात्र, शिवसेना नेते संदेश पारकर यांनी कर्फ्यूला कडाडून विरोध केल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
शहरात सध्या 225 हून अधिक कोरनाबाधित आहेत. मागील सहा महिन्यात व्यापारी आणि नागरीकांना त्रास होईल, असा एकही निर्णय कणकवली नगरपंचायतीने घेतलेला नाही. मात्र, आता कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कणकवली शहर आठ दिवस बंद ठेवणे अत्यावश्यक असल्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले. केवळ दुकानेच नव्हे तर शहरातील बँका आणि अन्य आस्थापनादेखील बंद असणार आहेत. मात्र, शिवसेना नेते संदेश परकर यांनी या कर्फ्यूला विरोध केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
जनता कर्फ्यू जनतेतून उत्स्फूर्तपणे असेल तर ठिक आहे. मात्र, कोरोना रोखण्यासाठी कर्फ्यू हा एकमेव पर्याय नाही. याचा दुष्परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होतो. म्हणूनच कर्फ्यूच्या नावाखाली प्रशासन दंडेलशाही करत असेल तर ते खपवून घेणार नाही. वेळ आली तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा शिवसेना नेते व कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिला.
कणकवली नगरपंचायतीचे अनेक कर्मचारी, नगरसेवक कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यावेळी एकही दिवस नगरपंचायत का बंद केली नाही? तेथून कोरोनाचा प्रसार होत नव्हता का? कोरोना रोखण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कोणत्या उपाययोजना नगरपंचायतीने राबवल्या? असे अनेक प्रश्न पारकर यांनी उपस्थित केले. गेल्या सहा महिन्यात कणकवली नगर पंचायतीने कोरोनाच्या नावाखाली अनावश्यक उपाययोजना राबवल्या. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. त्या खर्चाचे जनता ऑडिट करण्याची करण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका पारकर यांनी घेतली आहे.
दरम्यान, आज कर्फ्यूला जनतेतून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बाजारपेठ बंद असली तरी आम्ही मोबाइल नंबर दिलेले आहेत, त्या नंबरवर नागरिकांना अत्यावश्यक सेवा मिळतील. त्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले आहे. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.