सिंधुदुर्ग - जिल्ह्यात येणाऱ्या परजिल्ह्यातील व परराज्यातील नागरिकांना संस्थात्मक अलगीकरणामध्ये ठेवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने या संस्थात्मक अलगीकरणाच्या ठिकाणी पोलीस गस्त सुरू करण्यात आली आहे. दिनांक 20 मे 2020पासून नेमून दिलेले गस्ती पथक कक्षांच्या ठिकणी भेट देत आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी दिली आहे.
संपूर्ण जिल्ह्यामध्ये संस्थात्मक अलगीकरणाच्या ठिकाणी गस्तीसाठी 20 पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत. त्यामध्ये 30 वाहने, 30 पोलीस अधिकारी, अंमलदार, सेक्टर पेट्रोलिंग यांचा समावेश आहे. तसेच संस्थात्मक विलगीकरण कक्ष बंदोबस्तासाठी 220 होमगार्ड कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ही पथके त्यांना ठरवून दिलेल्या गावांच्या हद्दीतील तसेच पोलीस ठाणे हद्दीतील गावांमधील संस्थात्मक विलगीकरण कक्षांना भेटी देऊन सुरक्षा व इतर परिस्थितीचा आढावा घेणे, नियंत्रण समितीशी समन्वय ठेवणे, कायदा व सुव्यवस्था आबाधित राहील या दृष्टीने पेट्रोलिंग करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.