सिंधुदुर्ग - दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा या राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी करून प्रवेश देण्याचा शासकीय निर्णय झाला आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग आणि गोवा राज्याच्या सीमेवर बांदा सटमटवाडी येथील चेकपोस्टवर आजपासून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील महसूल आणि आरोग्य विभागाची संयुक्त पथके या कार्यासाठी नेमण्यात आली असून, त्यांच्याकडून प्रवाशांच्या गाडीची आणि वैयक्तिक माहितीची नोंद केली जात आहे.
पथकाकडून थर्मल गनने प्रत्येक प्रवाशाचे शारीरिक तापमान तपासले जात आहे. 99 अंशपेक्षा जास्त शारीरिक तापमान असलेल्यांना जवळच्या शासकीय रुग्णालयात अधिक तपासणी तथा उपचारासाठी पाठवले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ही आरोग्य तपासणी होत आहे.
प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग
शासनाच्या आदेशानुसार आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीतील बांदा येथे प्रवाशांची तपासणी करून त्यांना जिल्ह्यात घेतो. प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग केले जाते. ज्यांचे शारीरिक तापमान 99 अंशापेक्षा जास्त आहे, त्यांना एकतर पुन्हा गोव्यात पाठवतो किंवा त्यांची बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटिजेन चाचणी केली जाईल. तिथे ते पॉझिटिव्ह सापडले तर, त्यांना आम्ही शेर्ले येथे सीसीसी सेंटरमध्ये दाखल करणार आहोत, अशी माहिती सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली.
हेही वाचा - सिंधुदुर्गात नव्याने सापडले कातळशिल्प; अश्मयुगीन पाऊल खुणा