सिंधुदुर्ग - कोकण रेल्वे मार्गावर खास गणेशोत्सवाकरिता सोडण्यात आलेल्या दोन गाड्या सावंतवाडी रेल्वे स्थानकावर दाखल झाल्या. मात्र, या गाड्यांकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे. या दोन्ही गाड्यातून कुडाळ स्थानकात २२ तर २४ प्रवासी सावंतवाडीत उतरले. यातील केवळ एका प्रवाशाने आपली कोरोना चाचणी केली असून अन्य प्रवाशांनी कोरोना चाचणी केली नसल्याचे तेथील उपस्थित आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
ज्या प्रवाशांच्या चाचण्या झाल्या नाहीत, त्यांना ग्रामपंचायतीच्या परवानगीनुसार गावात पाठविण्यात आले आहे. या दोन गाड्या परत मुंबईला रवाना झाल्या असून त्यातून एकूण तीस प्रवासी मुंबईला गेले आहेत. सावंतवाडी रोड स्थानकावर आरोग्य विभागाच्या वतीने दोन पथके तैनात करण्यात आली आहे. प्रत्येक प्रवाशाची थर्मल स्क्रीनिंगद्वारे चाचणी करून हमी पत्रानुसार त्यांना सोडण्यात येत आहे. कोकणातील गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या सोडूनही चाकरमान्यांनी कोकणात जाण्याकडे पाठ फिरवल्याचे समोर आले आहे.
दरम्यान रेल्वेने येणाऱ्या चाकरमान्यांबाबत शासनाकडून कोणतीही स्वतंत्र नियमावली लागू करण्यात आलेली नाही. परंतू, यापूर्वी जी नियमावली लागू केलेली आहे, तीच नियमावली रेल्वेने येणाऱ्या चाकरमान्यांसाठी लागू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. रेल्वेने येणाऱ्या चाकरमान्यांना आगमनाच्या ४८ तास अगोदर कोरोनाची चाचणी करून घ्यावी लागणार आहे. शिवाय, ही चाचणी निगेटिव्ह असणे बंधनकारक असेल. गावात आलेल्यांना तीन दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. कोरोना चाचणी न केलेल्यांना दहा दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे.
रेल्वेने येणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी होणार असून त्यासाठी महसूल, पोलीस व आरोग्य विभागाची संयुक्त पथके प्रत्येक रेल्वे स्थानकावर नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत येणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंगद्वारे प्राथमिक आरोग्य तपासणी केली जात आहे. सर्व प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून आरोग्य यंत्रणा त्यासाठी दक्ष आहे. तसेच चाकरमान्यांनीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वप्रकारची खबरदारी घ्यावी. कोरोनाची लक्षणे असल्यास चाकरमान्यांनी स्वत: पुढे येऊन माहिती द्यावी व कोरोना तपासणी करून घ्यावी. तसेच सोशल डिस्टन्सिंगचा नियम सर्वांनी पाळावा, असे आवाहन सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.