सिंधुदुर्ग - गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना सात दिवसांच्या होम क्वारंटाईनची परवानगी द्या, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) सरचिटणीस व माजी आमदार परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. ऐन वेळी होणारा गोंधळ लक्षात घेता, चाकरमान्यांना जिल्ह्यात येण्यासाठी आवश्यक असलेले 'ई पास'तसेच आवश्यक परवानगीचे नियोजन आत्ताच करा, असेही उपरकर यांनी सुचवले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मोठा वर्ग मंत्रालय, शासकीय, निमशासकीय कार्यालये, विविध खासगी कंपन्यांतील नोकऱ्यांमुळे मुंबईत वास्तव्यास आहे. कोरोनामुळे मुंबईमध्येच त्यांना ३ महिने क्वारंटाईन रहावे लागले. या कालावधीत अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली. महिन्याभरापासूनच त्यांचा कामधंदा पुन्हा सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत सिंधुदुर्गातील कोरोना संसर्गाचे कारण दाखवून गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना १४ दिवसाचे संस्थात्मक क्वारंटाईन करणे व नंतर १४ दिवसांचे होम क्वारंटाईन करणे संयुक्तिक होणार नाही, असे उपरकर म्हणाले.
अनेक चाकरमान्यांचा घरगुती गणपती हा दीड दिवसांचा किंवा पाच दिवसांचा असतो. अशावेळी त्यांना केवळ ५ ते ७ दिवसाची रजा काढून गावी यावे लागते. शिवाय २ दिवस अगोदर येऊन आपल्या घरांची साफसफाई व रंगरंगोटीही करावी लागते. त्यामुळे या चाकरमान्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांना ई-पास देण्यात यावा. ज्यांची घरे पूर्णतः रिकामी आहेत त्यांना त्यांच्याच घरात फक्त ७ दिवसांचे होम क्वारंटाईन करावे. ज्यांना लॉजिंग व इतर ठिकाणी क्वारंटाईन होणे शक्य आहे, त्यांना त्याठिकाणी राहाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी उपरकर यांनी केली आहे.