सिंधुदुर्ग - गोव्यातील मडगाव शहरातील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात मंगळवारी दुपारी ऑक्सिजन गळतीची घटना घडली. ही गळती रोखण्यात यश आले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान या घटनेची चौकशी केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ऑक्सिजन भरताना झाली दुर्घटना -
दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय हे कोविडच्या रुग्णांवर उपचार करणारे दक्षिण गोवा जिल्ह्यातील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय आहे. फातोर्डा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कपिल नायक यांनी यासंदर्भात सांगितले, की "जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य टाकीमधील टँकरमध्ये ऑक्सिजन भरत असताना ही गळती झाली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच गळतीवर काही वेळातच पूर्णतः नियंत्रण मिळविले आहे”. दरम्यान अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनातील अधिकारी घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी दाखल झाले आहेत. घटनेची चौकशी करून याबाबतचा सविस्तर अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान टँकरमधला ऑक्सिजन टाकीत भरताना पाइप लिकेज होऊन ही घटना घडल्याची रुग्णालयाचे कर्मचारी बाजीराव देसाई यांनी सांगितले.