सिंधुदुर्ग - लॉकडाऊनमुळे शहरात अडकलेल्या चाकरमान्यांना गावी आणण्यावरून राजकीय पक्षांकडून चढाओढा लागली आहे. मात्र, जिल्ह्यातील सरपंच संघटनेने मात्र चाकरमान्यांना गावात आणण्यावरुन विरोध केला आहे. या सदर्भात संघटनेने पालकमंत्री उदय सामंत व जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन विरोध दर्शवला आहे. झोन निहाय रुग्णांची विभागणी करून त्यांना कॉरंटाईन करा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
शासन चाकरमान्यांना गावातील शाळा व मंदिरात ठेवण्याच्या हालचाली करत असताना सरपंच संघटनेने याला विरोध केला आहे. गावातील शाळा व मंदिरात राहण्यासाठी सुविधा नाहीत. पाणी, शौचालय, बाथरूमची योग्य सुविधा नाही. मग कोणतीही सुविधा नसताना हा घाट कशासाठी घातला जातोय? असा सवाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
त्याशिवाय रेडझोन मधुन आलेल्या चाकरमान्यांना तालुकास्तरावरील मोठ्या कॉलेज, संस्थामध्ये क्वारंटाईन करून योग्य ती तपासणी करूनच त्यांना गावात प्रवेश द्यावा, अशी मागणीही सरपंचं संघटनेने केली आहे. या सदर्भात शासनाने योग्य ती पावले उचलावीत. गावातील सरपंचाना नाहक वेठीस धरल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा इशाराही दोडामार्ग मधील सरपंचानी दिला आहे. दरम्यान, सरपंच संघटनेच्या या भूमिकेमुळे सिंधुदुर्गतील वातावरण चाकरमानी विरुद्ध सरपंच असे झाले आहे.