सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील सावंतवाडी येथील 70 वर्षीय कोरोनाबाधित वृद्धाचा आज(सोमवार) मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मृत्यू झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4 अशी झाली आहे.
सांवतवाडीतील एका वृद्धाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हा वृद्ध रुग्ण 10 जूनरोजी मुंबई येथून आला होता. त्याला मधुमेह, उच्चरक्तदाब, श्वसनदाह असे आजार होते, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली. जिल्ह्यात आज आणखी 10 रुग्णांना उपचाराअंती डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 94 झाली आहे. तर, जिल्ह्यात आजपर्यंत 55 सक्रिय रुग्ण आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत आलेले एकूण 2 हजार 976 नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत. त्यातील 2 हजार 901 अहवाल प्राप्त झालेले नमुने आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेले नमुने 154 असून, निगेटिव्ह आलेले नमुने 2 हजार 747 आहेत. तर, अहवाल प्राप्त न झालेले 75 नमुने आहेत. जिल्ह्यात सध्या संस्थात्मक अलगीकरणात 17 हजार 927 व्यक्ती आहेत. शासकीय संस्थांमधील अलगीकरणात 146 व्यक्ती आहेत. तर, गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणात 15 हजार 968 व्यक्ती आहेत. नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणात 1 हजार 813 व्यक्ती आहेत. तर, 2 मे पासून आतापर्यंत जिल्ह्यात 96 हजार 172 व्यक्ती दाखल झाले आहेत.