सिंधुदुर्ग - आमच्या राज्याला मुख्यमंत्रीच राहिलेला नाही. राज्याचे अधिवेशन सुरू आहे आणि मुख्यमंत्री दिसत नाही, म्हणजे राज्य नेमके चालवत कोण आहे? राज्याचा चार्ज कोणाकडे दिला आहे? हे आम्हाला माहीत नाही. रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करणार आहेत, अशी चर्चा आहे, ते तरी जाहीर करा. स्वपक्षाच्या एकही नेत्यावर ठाकरे कुटुंबीयांचा विश्वास राहिलेला नाही. अशा अवस्थेत अधिवेशनाच्या माध्यमातून जनतेला न्याय कसा मिळणार? असा प्रश्न विचारत आमदार नितेश राणे यांनी सरकारवर टीका केली.
हेही वाचा - रायगड : खोपोलीतील महिंद्रा सान्यो कंपनीत ऑक्सिजन रियॅक्टरचा स्फोट
सगळी काळजी ही फक्त एका कुटुंबीयांसाठी घेतली जात आहे
जनता खडबडीत रस्त्यावर, जनता खड्ड्यात आणि राजाचे रस्ते गुळगुळीत. आम्ही रस्त्यासाठी पैसे मागतो तेव्हा पैसे नाहीत, असे आम्हाला सांगितले जाते. सीएमसाठीपण वर्षा ते विधानसभा रस्ता गुळगुळीत होतो. हेच तर महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. म्हणजे जनतेने आपली काळजी स्वतः घ्यावी, पण सगळी काळजी ही फक्त एका कुटुंबीयांसाठी घेतली जात आहे.
सहकारात परिवर्तन आणण्यासाठी जिल्हा बँक निवडणूक लढवत आहे
सहकार क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आम्ही जिल्हा बँकेची निवडणूक लढवत आहे. तसेच सहकार, शेती, महिला आदी क्षेत्रात आम्ही काय करणार याचा अजेंडा घेऊन आम्ही मतदारांपुढे जात आहे. आम्ही विकासासाठी निवडणूक लढवत आहे. त्यामुळे, विरोधक जे आरोप करताहेत त्या सर्व आरोपांची उत्तरे आम्ही ३० डिसेंबर नंतर देणार आहोत. तसेच, जिल्हा बँकेतील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना आम्ही कायम स्वरुपी सेवेत घेऊ, अशी ग्वाही आमदार नितेश राणे यांनी आज दिली.
जिल्हा बँकेने पाच वर्षांत अनेक नोकर भरती केली. पण, ते सर्वजण रोजंदारीवर आहेत. त्यांची मस्टरवर सही नाही. या सर्वांना कायमस्वरुपी करण्यासाठी जबाबदारी आणि शब्द आम्ही पॅनेलच्या माध्यमातून देतो आहे. दरम्यान आमच्यावर प्रतिभा दुध डेअरीबाबतही आरोप होत आहेत. मात्र, या आरोपांचे उत्तरही प्रतिभा डेअरीकडून दिले जाणार आहे, असे आमदार नितेश राणे म्हणाले.
हेही वाचा - रायगड : तळवली गावाजवळ सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह