कोल्हापूर : पाठीचा तसेच मानेचा त्रास जाणवू लागल्याने आमदार नितेश राणे यांना सोमवारी सायंकाळी येथील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. आजच्या तिसऱ्या दिवशीही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र काल पासून त्यांची प्रकृती थोडी बरी नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना रात्री तीन वेळा उलटीचा त्रास झाला. त्यांच्यावर डॉक्टर उपचार करत आहेत.
जमीन अर्जावर आज सुनावणी
दरम्यान, आमदार नितेश राणे आणि त्यांचा खाजगी सचिव राकेश परब यांच्या जमीन अर्जावर आज बुधवारी सुनावणी होणार आहे. याबाबतचा युक्तिवाद काल मंगळवारी पूर्ण झाला. न्यायालयाने याबाबतचा निर्णय राखून ठेवला होता. आज दुपारी 3 पर्यंत याची सुनावणी होणार असून नितेश राणे यांना जमीन मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
तज्ञ डॉक्टरांच्या टीम मार्फत उपचार
छातीत तसेच पाठीचा त्रास सुरू झाल्याने नितेश राणे यांना कोल्हापूरात हलविण्यात आले. येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील हृदयरोग विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अधिक त्रास जाणवू लागल्याने त्यांना 'आयसीयू'मध्ये हलविण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सीपीआर रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार केली आहे. त्यामध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय अधिकार्यांचा समावेश आहे.
काय आहे प्रकरण?
संतोष परब हल्लाप्रकरणी (Santosh Parab Attack Case) भाजप आमदार नितेश राणे यांना न्यायालयाने कोठडी (MLA Nitesh Rane judicial custody) सुनावली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर झालेल्या वैद्यकीय तपासणीत त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती जास्त बिघडली. ज्यात त्यांना पाठीचा आणि मानेचा तसेच छातीचा त्रास होत असल्याने त्यांना कोल्हापुरात आणले.