सिंधुदुर्ग - रत्नागिरी-सिंधुदुर्गाचे खासदार विनायक राऊत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे खासदार विनायक राऊत ट्रोल झाले आहेत. या व्हिडीओवरून भाजप आमदार नितेश राणे यांनी विनायक राऊतांवर निशाणा साधला आहे. नितेश राणे यांनी ट्विट करत विनायक राऊत यांच्यावर टीका केली. देवा अशा मूर्खांपासून माझ्या कोकणाला आता तूच वाचव, असे नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे दोन दिवस कोकणच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांनी मास्क परिधान केला होता. मात्र अचानक खासदार राऊत यांना शिंक आली आणि ते चेहऱ्यावरचा मास्क बाजूला करून शिंकले. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून मास्क घालतात. मात्र शिंकताना खासदार राऊत नेमके हेच विसरले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ते ट्रोल झाले आहेत.
आमदार नितेश राणे यांनीदेखील हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला असून, देवा अशा मूर्खांपासून माझ्या कोकणाला आता तूच वाचव, असे म्हटले आहे. ”रत्नागिरी सिंधुदुर्गच्या खासदारांना एकदा विचारा त्यांनी मास्क का घातला आहे?, अशा मूर्खांपासून माझ्या कोकणाला आता देवानेच वाचवावे”, अशा शब्दांत आमदार नितेश राणेंनी खासदार विनायक राऊत यांचा समाचार घेतला आहे. आता यावरून पुन्हा एकादा शिवसेना आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगण्याची शक्यता आहे.