रत्नागिरी - मेव्हणा अडकल्याने मुख्यमंत्री ( CM Uddhav Thackeray ) अस्वस्थ झाले आहेत, 2 वर्ष महाराष्ट्र रडत होता, तेव्हा मुख्यमंत्री एवढे सक्रिय दिसले नाहीत. पण काल लगेच सभागृहात येऊन पाच दहा मिनटांचं भाषण केलं, ते काय बोलले त्यांनाच माहीत नाही, अशी टीका भाजपा प्रदेश चिटणीस माजी खासदार निलेश राणे ( Nilesh Rane Critisized Uddhav Thackeray ) यांनी केली आहे. तसेच मेव्हण्याने चोरी केली आहे, तर कारवाई होणारच, यामध्ये केंद्र सरकारचा दबाव आला कुठून, ही जुनी केस आहे, असेही ते म्हणाले.
'अनेक पाटणकर आत जातील' - पाटणकर हे मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे आहेत. त्यांच्या 11 नव्हे तर 1100 प्रॉपर्टी असतील, शिवसेनेने बरंच काही केलं आहे, ते एकेक करून बाहेर निघणार, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच अनेक पाटणकर आत जातील, असा टोला यावेळी निलेश राणे यांनी लगावला.
'आम्ही सर्व सोमैयांबरोबर आहोत' - किरीट सोमैया यांचा उद्याचा दापोली दौरा आहे. आम्हाला कोण रोखतो ते आम्ही पाहतोच, असं प्रति आव्हान भाजपचे नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडीला दिले आहे. किरीट सोमैया यांच्या दापोली दौऱ्यावरून महाविकास आघाडीने त्यांना रोखण्याची भाषा केली होती. त्याला निलेश राणे यांनीही उत्तर दिले आहे. एखादा व्यक्ती प्रशासनाला काही विचारू शकत नाही का? कायदा सुव्यवस्था सांभाळायची जबाबदारी आता पोलीस प्रशासनावर आहे. परिस्थिती चिघळली तर आम्ही काय हात बांधून जाणारे नाहीत, जे होईल ते जमिनीवर, नाय त्या धमक्या शिवसेना राष्ट्रवादीने देऊ नये, असा इशारा निलेश राणे यांनी यावेळी दिला.