सिंधुदुर्ग - मेडिकल कॉलेजच्या परवानगीसाठी खासदार नारायण राणे हे दोन महिन्यापूर्वी मातोश्रीवर फोन करत होते, असा गौप्यस्फोट शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्गात बोलताना केला आहे. तर आमदार नितेश राणे यांनी एका व्यक्तीची १२ कोटींची फसवणूक केली आहे, असाही आरोप त्यांनी यावेळी केला.
मेडिकल कॉलेजच्या परवानगीसाठी नारायण राणे यांचा मातोश्रीवर फोन
नारायण राणेंच्या मेडिकल कॉलेजला फडणवीस यांनी अखेरपर्यंत परवानगी दिली नाही, म्हणून राणे दोन महिन्यांपूर्वी मातोश्रीवर दिवसातून तीन तीन वेळा फोन करत होते. अखेर उद्धव ठाकरेंनी कोकणात मेडिकल कॉलेज होत असल्यामुळे परवानगी दिली. उद्धव ठाकरेंना काही कळत नाही असा आरोप करता. नको कळू दे, पण टीका करताना शान राखून टीका करा, असा सल्लाही विनायक राऊत यांनी राणेंना दिला होता.
देवेंद्र फडणवीस नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते
आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात देवेंद्र फडणवीस हे नितेश राणे यांना तुरुंगात टाकणार होते. त्यांनी एका व्यक्तीला १२ कोटीचा गंडा घातला होता. पण नारायण राणे भाजपला शरण गेले. त्यामुळे ती केस थांबली. आम्ही मनात आणलं तर ती केस एका दिवसात ओपन होऊ शकते. ती एक ओपन झाली तर दुसऱ्याच महिन्यात नितेश राणे तुरुंगात गेल्याशिवाय राहणार नाहीत, असा दावा विनायक राऊत यांनी केला होता.
हेही वाचा - लस नेण्यासाठी सहा कंटेनर सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल